वॉशिंग्टन – पॅसिफिक महासागर क्षेत्रातील गुआम बेटासाठी अमेरिकेने ‘एफ-22 रॅप्टर’ विमानांचे दोन स्क्वाड्रन्स रवाना केले. येत्या काही दिवसात सुरू होणार्या ‘ऑपरेशन पॅसिफिक आयर्न’ युद्धसरावासाठी ही तैनाती असल्याचा दावा केला जातो. पण पॅसिफिक क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने लढाऊ विमाने रवाना करून अमेरिकेने चीनला इशारा दिल्याचे माजी अधिकारी व लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, चीनबरोबरील तणाव वाढत असताना, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन या महिनाअखेरीस फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि सिंगापूर या आग्नेय आशियाई देशांचा दौरा करणार असल्याची बातमी आहे.
काही तासांपूर्वी अमेरिकेच्या हवाईदलाने सुमारे 25 एफ-22 स्टेल्थ विमाने गुआम बेटावरील तीन हवाईतळांवर तैनात केली. त्याचबरोबर 10 एफ-15ई स्ट्राईक इगल्स लढाऊ, दोन सी-130जे हर्क्युलिस मालवाहू विमाने आणि सुमारे 800 जवान ‘ऑपरेशन पॅसिफिक आयर्न 2021’ सरावासाठी दाखल झाली आहेत. गुआम आणि टिनियान बेटांच्या क्षेत्रात आयोजित होणार्या या युद्धसरावासाठी आत्तापर्यंतची ही मोठी तैनाती मानली जाते. ‘पॅसिफिक हवाईदलाच्या क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने एफ-22ची तैनाती याआधी कधीच झाली नव्हती’, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या पॅसिफिक हवाईदल कमांडचे प्रमुख जनरल केन विल्सबॅश यांनी दिली.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-warns-china-by-sending-f-22-for-training-in-pacific/