तैपेई – चीनविरोधातील ‘सायबर वर्ल्ड वॉर थ्री’ साठी तैवान पूर्णपणे सज्ज असल्याची घोषणा तैवानच्या सायबर सुरक्षेचे प्रमुख चेन हुंग-वी यांनी केली. दर महिन्याला तैवानवर दोन ते चार कोटी सायबर हल्ले होतात. यातील बहुतांश सायबर हल्ले चीनमधून केले जात आहेत, असा गंभीर आरोप हुंग-वी यांनी केला. मात्र यातील बहुतेक सायबर हल्ले तैवान यशस्वीरित्या परतवित असल्याचे हुंग-वी यांनी म्हटले आहे.
तैवान गिळंकृत करण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत असल्याचा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी गेल्या महिन्यात केला होता. तैवानच्या विरोधात क्षेपणास्त्रे तैनात करण्यापासून तैवानच्या हद्दीत लढाऊ विमाने आणि विनाशिकांची घुसखोरी घडविणे चीनने सुरू ठेवले. त्याचबरोबर तैवानबरोबर सहकार्य करणार्या पलाऊ, पॅराग्वे, निकारगुआ या देशांवर चीनने राजकीय दबाव वापरल्याचे परराष्ट्रमंत्री वू यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना लक्षात आणून दिले होते. तैवानच्या लोकशाहीवादी नेतृत्वाविरोधात अपप्रचार करण्यासाठी चीन सायबर हल्ल्यांचा वापर करीत असल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री वू यांनी ठेवला होता.
तैवानच्या सायबर सुरक्षेचे प्रमुख चेन हुंग-वी यांनी अमेरिकी वृत्तवाहिनशी बोलताना, चीन तैवानविरोधात या सायबर महायुद्ध छेडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यासाठी तैवानच्या यंत्रणा मोठा सायबर सुरक्षा सराव करीत असल्याची माहिती हुंग-वी यांनी दिली. सायबर क्षेत्रातील 24 हून अधिक तज्ज्ञांच्या साथीने तैवानच्या सरकारी यंत्रणांवर लाखो सायबर हल्ले चढवून ते परतवून लावण्याचा सराव केला जात असल्याचे हुंग-वी यांनी स्पष्ट केले.
तैवानचे सर्व व्यवहार मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर अवलंबून आहेत. ‘गॅस, पाणी, वीज आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा या पूर्णपणे डिजिटल केल्या आहेत. त्यामुळे अशा सायबर हल्ल्यांवेळी तैवानची पूर्ण यंत्रणा कोलमडू शकते. त्यामुळे अशा तयारीची आवश्यकता असल्याचे हुंग-वी म्हणाले.
दर महिन्याला तैवानच्या यंत्रणांवर दोन ते चार कोटी सायबर हल्ले केले जातात. यापैकी बहुतांश सायबर हल्ले चीनमधून केले जात असल्याचा आरोप तैवानच्या सायबर सुरक्षा प्रमुखांनी केला. या सायबर हल्ल्यांची कार्यपद्धती पाहता, याचे मूळ चीनमध्ये असल्याचा खात्रीलायक विश्वास हुंग-वी यांनी व्यक्त केला.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीशी संलग्न असलेले सायबर हल्लेखोर, हॅकर्स गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांवर झालेल्या सायबर हल्ल्यांमागे चिनी हॅकर्स असल्याचे उघड झाले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |