लिव्हरपूल – अणुकराराबाबत आपल्या मागण्यांवर अडून बसलेल्या इराणला ब्रिटन आणि जर्मनीने खडसावले. ‘अणुकरार वाचवायचा असेल तर व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी ही इराणसाठी शेवटची संधी आहे. वेळ निघून जात आहे’, असा इशारा ब्रिटन व जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जी७च्या बैठकीत दिला. अमेरिकेने निर्बंध मागे घेतले तरच अणुकरार शक्य असल्याची घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी काही तासांपूर्वी केली होती. त्यावर ब्रिटन व जर्मनीने ही प्रतिक्रिया दिली आहे.
इराणबरोबरच्या अणुकराराबाबत व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या चर्चेला दोन आठवडे पूर्ण झाले. पण तडजोड करण्यास तयार नसलेल्या इराणवर युरोपिय देश नाराज आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये इराणने अमेरिका व युरोपिय देशांसमोर अणुकरारात सहभागी होण्याआधी आपल्या मागण्या मान्य करण्याची अट ठेवली आहे. याबाबत अधिक खुलासा होऊ शकलेला नाही. पण अमेरिकेने इराणला निर्बंधातून मुक्त करावे, अशी मागणी इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केल्याचा दावा केला जातो. शनिवारी चिनी वर्तमानपत्राशी बोलताना देखील राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी इराणच्या मागण्यांवर अमेरिकेने विचार करावा, असे सुचविले.
रविवारी ब्रिटनच्या लिव्हरपूल येथे पार पडलेल्या जी७च्या बैठकीत इराणच्या या मागण्यांवर पडसाद उमटले. ब्रिटन व जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उघडपणे इराणला फटकारले. अणुकराराच्या चौकटीत बसणार्या मागण्यांवरच विचार होऊ शकतो, असे ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, ‘या अणुकरारात सहभागी होण्यासाठी ही शेवटची संधी आहे, हे इराणने लक्षात ठेवावे. कारण ब्रिटन इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही’, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री ट्रूस यांनी केली.
जर्मनीच्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ऍनाबेला बेरबॉक यांनी देखील जी७च्या बैठकीतच इराणला इशारा दिला. ‘गेल्या काही दिवसांमध्ये व्हिएन्ना येथील चर्चेत प्रगती झालेली नाही. इराणच्या सरकारने केलेल्या मागण्यांमुळे अणुकरारावर सुरू असलेल्या वाटाघाटी सहा महिने मागे गेल्या आहेत. अणुकरारासाठीची वेळ निघून जात आहे’, अशी टीका बेरबॉक यांनी केली.
काही दिवसांपूर्वी फ्रान्सने देखील व्हिएन्ना येथील वाटाघाटींवरुन इराणला फटकारले होते. त्यावर इराणने फ्रान्सवर ताशेरे ओढले होते. पण रविवारी जी७च्या बैठकीनंतर युरोपच्या ‘ईयु३’ किंवा ‘युरोप ट्रॉयका’मधील ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने यासाठी तीनही युरोपिय देशांवर जोरदार टीका केली.
दरम्यान, जी७च्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन देखील उपस्थित होते. पण त्यांनी युरोपिय देशांप्रमाणे इराणच्या मुद्यावर विशेष प्रतिक्रिया दिली नाही. बायडेन प्रशासन अजूनही इराणबरोबरील वाटाघाटींवर ठाम असून इस्रायलसह युरोपिय देशांचाही इराणबाबतचा संयम संपत चालल्याचे दिसत आहे. इस्रायलने तर आपल्या लष्कराला इराणवर हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |