रशियन राष्ट्राध्यक्षांकडून दोन नवे ‘डूम्सडे प्लेन्स’ सज्ज ठेवण्याचे आदेश

नवे ‘डूम्सडे प्लेन्स’

मॉस्को – अणुयुद्धादरम्यान रशियन संरक्षणदलांच्या कमांडवर नियंत्रण राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन नवी ‘डूम्सडे प्लेन्स’ सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रशियातील ‘व्होरोनेझ एव्हिएशन प्लँट’वर या विमानाची उभारणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी ‘डूम्सडे प्लेन्स’ ही चार इंजिन्स असणार्‍या ‘आयएल 96-400एम’ या प्रवासी विमानांवर आधारित असतील, असे सांगण्यात येते.

अणुयुद्ध किंवा इतर भयावह आपत्तीमध्ये जमिनीवरील संरक्षणदलांची कमांड उद्ध्वस्त झाल्यास संरक्षणदलाची कमांड हाताळण्याची यंत्रणा असणार्‍या विमानांना ‘डूम्सडे प्लेन्स’ म्हणून ओळखण्यात येते. अमेरिका व रशिया या दोन्ही देशांकडे प्रत्येकी चार ‘डूम्सडे प्लेन्स’ असल्याचे सांगण्यात येते. रशियाकडे असणारी ‘डूम्सडे प्लेन्स’ 1970-80च्या दशकातील असून ‘आयएल-80’ या प्रवासी विमानांवर आधारलेली आहेत.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/russian-president-orders-two-new-doomsday-planes/