लंडन – ‘मर्सर स्ट्रीट’ या इंधनवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात आपल्या नागरिकाचा बळी गेल्यामुळे खवळलेल्या ब्रिटनने इराणला धडा शिकविण्याची तयारी केली आहे. स्पेशल फोर्सेचा वापर करून थेट इराणच्या ड्रोन कमांड सेंटरवर कारवाई करणे, सायबर हल्ले चढविणे किंवा अन्य पर्यायांवर ब्रिटन विचार करीत असल्याची माहिती ब्रिटनच्या वर्तमानपत्राने दिली. याआधीच अमेरिका, इस्रायल, ब्रिटन आणि रोमानिया या देशांमध्ये इराणला प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा झाली होती. दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी देखील सागरी सुरक्षा धोक्यात टाकणार्या इराणवर कारवाईचा इशारा दिला होता.
गेल्या आठवड्यात ओमानच्या सागरी क्षेत्राजवळून आखातासाठी प्रवास करणार्या ‘मर्सर स्ट्रीट’ इंधनवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन कर्मचार्यांचा बळी गेला. यामध्ये ब्रिटन व रोमानियाच्या नागरिकांचा समावेश होता. याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. अमेरिका व ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यावर संताप व्यक्त केला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इराणला परिणामांसाठी तयार राहण्याचे बजावले. पण पाश्चिमात्य मित्रदेश इराणविरोधात कोणती कारवाई करणार ते स्पष्ट झाले नव्हते.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/britain-will-respond-to-iran-for-attacking-oil-tankers/