सार्वजनिक माफीची घोषणा करणाऱ्या तालिबानचा क्रूर चेहरा जगासमोर आला

तालिबानकडून अफगाणी निदर्शक, लष्करी अधिकाऱ्यांची हत्या

सार्वजनिक माफी

काबुल – पाकिस्तानच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबानने अफगाणी लष्कर व विरोधकांना सार्वजनिक माफी जाहीर केली होती. आपल्याला शरण येणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करणार नसल्याचे सांगून तालिबानने आपण बदलल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला खरा. पण गेल्या चोवीस तासात तालिबानने शरण आलेल्या चार अफगाणी लष्करी अधिकाऱ्यांची कत्तल केली. तसेच अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकावून तालिबानला विरोध करणाऱ्या चौघांना गोळ्या घालून ठार केले. तसेच अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नरला तालिबानने अटक केली. यामुळे तालिबानमध्ये बदल झाल्याचे दावे निकालात निघालेले आहेत.

तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने मंगळवारी अफगाणी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. तालिबानचे कुणाशीही वैर नसून आपल्या नेत्याने जाहीर केल्याप्रमाणे तालिबानने सर्वांना माफ केले आहे, असे मुजाहिदने सांगितले. तसेच प्रत्येक दिवसागणिक अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारत असल्याचा दावा करून महिलांवर बुरख्याची बंधने नसतील, असे मुजाहिद याने जाहीर केले होते. तालिबानच्या या घोषणेचे पाकिस्तानातील त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले होते. पण याला चोवीस तास उलटण्याच्या आधीच तालिबानमध्ये कसलाही बदल झाला नसल्याचे उघड झाले.

सार्वजनिक माफी

काही दिवसांपूर्वी कंदहारमधील संघर्षात तालिबानसमोर शरणांगती पत्करणाऱ्या अफगाणी लष्कराच्या चार कमांडर्सची तालिबानने निघृणरित्या हत्या केली. यामुळे तालिबानच्या ताब्यात असलेल्या इतर अफगाणी जवानांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानच्या या क्रूर राजवटीची कल्पना आलेल्या अफगाणिस्तानच्या जलालाबाद, खोस्त या प्रांतात जनतेने रस्त्यावर उतरून तालिबानच्या राजवटीविरोधात निदर्शने केली. यापैकी जलालाबाद येथील अफगाणी निदर्शकांवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हिंसक कारवाई केल्याचे व्हिडिओ, फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत.

तालिबानचा ध्वज स्वीकारणार नाही, अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवा, सरकारी कार्यालये सुरू करा, अशा घोषणा देणाऱ्या अफगाणी निदर्शकांवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये चार निदर्शकांचा बळी गेला तर 13 जण जखमी झाले. बळींची संख्या याहून कितीतरी अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. अफगाणी जनता तालिबानने शिथिल केलेल्या नियमांचा गैरफायदा घेत असल्याचे एका तालिबानी दहशतवाद्याने धमकावले. तालिबानच्या कमांडर्सनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

सार्वजनिक माफी

पण विरोधकांना माफ केल्याची घोषणा करणाऱ्या तालिबानने याच विरोधकांची धरपकड सुरू केल्याचे समोर येत आहे. अफगाणिस्तानच्या बलख प्रांताच्या गव्हर्नर सलिमा मझारी यांना तालिबानने ताब्यात घेतले. मझारी या महिलाच्या हक्कांच्या कडव्या समर्थक तसेच तालिबानच्या विरोधक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे मझारी यांना अटक करून आपल्या राजवटीत महिला तसेच विरोधकांची गय केली जाणार नसल्याचा इशारा तालिबानने दिल्याचे दिसत आहे. तालिबानच्या या दहशतीला घाबरुन शेकडो महिला अफगाणिस्तानातून पलायन करण्यासाठी काबुल विमानतळावर आल्या आहेत. काबुल विमानतळावरील गर्दीमध्ये साठ ते सत्तर टक्के इतक्या प्रमाणात महिला असल्याचा दावा केला जातो.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info