लंडन – अमेरिका व ब्रिटनने अफगाणिस्तानातून लष्कर माघारी घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा तसेच भयावह परिणाम घडविणारा आहे. या निर्णयामुळे आता ब्रिटनला 9/11च्या हल्ल्यांपूर्वी होता, त्याहून अधिक तीव्र दहशतवादी हल्ल्यांचा धोका आहे, असा इशाारा ब्रिटनचे माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल रिचर्ड केम्प यांनी दिला आहे. केम्प यांनी अफगाणिस्तानातील ब्रिटीश लष्कराचे कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
‘ब्रिटनला असलेला दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढलेला आहे. 9/11च्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी जितका धोका होता, त्याहून हा धोका कितीतरी जास्त प्रमाणात आहे. सिरियावर आयएसने ताबा मिळविल्यानंतर जो धोका होता, त्याहूनही अधिक मोठा धोका निर्माण झाला आहे. लवकरच जगाच्या विविध भागांमधील दहशतवादी अफगाणिस्तानात एकत्र येण्यास सुरुवात होईल. ते प्रशिक्षण घेतील, सज्ज होतील व ब्रिटनसारख्या देशांवर हल्ले चढविण्यास सुरुवात करतील’, असा इशारा माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल रिचर्ड केम्प यांनी दिला. अमेरिका व ब्रिटनने अफगाणिस्तानातून घेतलेली माघार आणि पराभव यामुळे ब्रिटनसह जगभरातील दहशतवाद्यांना प्रेरणा मिळाली आहे. हे दहशतवादी आता आपल्यावर हल्ले करतील, असे कर्नल रिचर्ड केम्प यांनी बजावले. आता गुप्तचर यंत्रणांच्या सहाय्याने हल्ल्यांची माहिती मिळविणे व त्यानुसार आपल्याला लक्ष्य करण्याची शक्यता असणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करणे हा एकमेव उपाय असल्याची जाणीव केम्प यांनी यावेळी करून दिली. मात्र अफगाणिस्तानात परदेशी फौजा नसल्याने कारवाईची क्षमताही कमी झाल्याकडे माजी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
ब्रिटनचे माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल सर रिचर्ड बॅरोन्स यांनी, ब्रिटन व ब्रिटनच्या हितसंबंधांना ‘आयएस-खोरासन’ गटाच्या दहशतवादी हल्ल्यांपासून सावध केले आहे. ही संघटना ब्रिटनच्या भूमीवर दहशतवादी हल्ले करु शकते. ‘आयएस-खोरासन’विरोधातील कारवाईसाठी भविष्यात ब्रिटनला कदाचित तालिबानचेही सहाय्य घ्यावे लागेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यापूर्वी ब्रिटन तालिबानच्या राजवटीला सशर्त मान्यता देईल, असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर ब्रिटनला असणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्याबाबत देण्यात येणारे इशारे लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत.
दरम्यान, ब्रिटनचे हवाईदलप्रमुख सर माईक विंग्स्टन यांनी, ब्रिटीश हवाईदल अफगाणिस्तानातील ‘आयएस’विरोधात हवाईहल्ले चढवू शकते, असा इशारा दिला आहे. ‘ब्रिटन किंवा ब्रिटनच्या सहकाऱ्यांना थेट अथवा अप्रत्यक्ष धोका निर्माण झाल्यास व दहशतवादी पुन्हा बळकट होत असल्याचे संकेत मिळाल्यास ब्रिटीश हवाईदल हल्ले चढवू शकते. आयएसविरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडीत ब्रिटनची महत्त्वाची भूमिका आहे’, असे एअरचीफ मार्शल सर माईक विंग्स्टन यांनी बजावले. अफगाणिस्तान हा अत्यंत दुर्गम भाग आहे, मात्र ब्रिटीश हवाईदल कारवाईस सक्षम आहे, असा विश्वास ब्रिटनच्या हवाईदलप्रमुखांनी यावेळी व्यक्त केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |