युक्रेन नाटोचा सदस्य बनणे हा रशियाच्या सुरक्षेला धोका – रशियन प्रवक्त्यांचा इशारा

मॉस्को – युक्रेनने सातत्याने नाटोचा सदस्य होण्याबाबत उघड इच्छा व्यक्त करणे हा रशियाच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. युक्रेनने नाटो व युरोपिय महासंघात सामील व्हावे म्हणून अमेरिका प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही पेस्कोव्ह यांनी केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला असून त्यात नाटोच्या सदस्यत्वाबाबत भूमिका मांडली होती. या पार्श्‍वभूमीवर रशियाचा इशारा महत्त्वाचा ठरतो.

सुरक्षेला धोका

रशिया हा समान शत्रू असल्याने अमेरिका व युक्रेन एकमेकांचे मित्र बनले आहेत. मैत्रीसाठी त्यांच्यात इतर कोणताही मुद्दा नाही. अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील नाटोत सहभागी होण्यासाठी युक्रेन सातत्याने व उघडपणे इच्छा व्यक्त करीत आहे. युक्रेनच्या या इच्छेला अमेरिकेकडून सातत्याने प्रोत्साहन देण्यात येत आहे. युक्रेनची नाटोत सामील होण्याची इच्छा रशियासाठी खूप मोठा धोका आहे. युक्रेन सदस्य झाल्यास नाटो आपले लष्कर रशियन सीमेच्या अधिक जवळ आणून तैनात करु शकते’, असे पेस्कोव्ह यांनी बजावले.

अमेरिका युक्रेनला युरोपिय महासंघाचा सदस्य होण्यासाठीही सहाय्य करीत असल्याचा आरोपही रशियन प्रवक्त्यांनी यावेळी केला. महासंघ व नाटो या दोन्ही यंत्रणा शीतयुद्धाचा घटक असल्याचा दावाही पेस्कोव्ह यांनी केला. युक्रेनचा दोन्हींमधील समावेश अमेरिका व युरोपला थेट रशियन सीमेनजिक आणून ठेवेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सुरक्षेला धोका

काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासमोर उघडपणे नाटोच्या सदस्यत्वासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना याबाबत आश्‍वस्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अमेरिका व युक्रेनमध्ये धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचे सांगून त्याद्वारे होणाऱ्या सुधारणा युक्रेनला नाटोच्या सदस्यत्वासाठी सहाय्यक ठरतील, असे अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी सांगितल्याचे समोर आले आहे.

मात्र युरोपिय देश युक्रेनच्या नाटोतील सदस्यत्त्वासाठी फारसे उत्सुक नसल्याची माहितीही समोर आली आहे. इस्टोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी एका वक्तव्यात युक्रेनला नाटोचे सदस्यत्वाचे निकष पूर्ण करण्यासाठी अजून दोन दशके लागतील, असा टोला लगावला होता.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देणे ही रशियासाठी ‘रेड लाईन’ ठरेल, असा इशारा यापूर्वीच दिला आहे. त्याचवेळी नाटोच्या विस्तारवादी धोरणांमुळे युरोपात अविश्‍वास व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे युरोपचे पुन्हा तुकडे होण्याची भीती आहे, असेही पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी बजावले होते. ‘शीतयुद्धाची अखेर संपूर्ण युरोपसाठी समानपणे विजय ठरेल, असे वाटले होते. मात्र तसे न होता युरोपात तणाव वाढू लागला व त्यासाठी नाटो कारणीभूत आहे’, असा आरोपही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info