वॉशिंग्टन/काबुल – ‘तालिबानने अफगाणिस्तानमधील युद्ध जिंकणे आणि त्यानंतर अमेरिकेने घाईघाईने घेतलेली माघार या गोष्टी जगभरातील दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारी ठरली आहे. तालिबान म्हणत आहे आम्ही अमेरिकेसह नाटोलाही पराभूत केले आहे. जगातील सर्वोच्च लष्करी सत्तेला मात दिली आहे. त्यामुळे दहशतवादी गटांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे’, असा खरमरीत टोला सीआयएचे माजी संचालक मायकल मॉरेल यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व त्यांच्या प्रशासनाला लगावला. मॉरेल यांच्यापाठोपाठ अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री तसेच सीआयएचे माजी प्रमुख लिऑन पॅनेटा यांनीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना फटकारले. बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील चुकांची जबाबदारी स्वीकारून राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय घ्यावे, असे पॅनेटा यांनी बजावले.
अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराची माघार पूर्ण झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन व प्रशासनावर होणार्या टीकेची धार अधिकच तीव्र होऊ लागली आहे. अमेरिकेच्या माघारीच्या निर्णयावर ब्रिटनसह इतर नाटो सदस्य देशांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. आता अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या काळात महत्त्वाच्या पदांवर असलेल्या माजी अधिकार्यांकडूनही बायडेन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे. मॉरेल यांचे वक्तव्य त्याचाच भाग दिसतो. मॉरेल यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ तसेच ओबामा यांच्या कार्यकाळात सीआयएचे ‘ऍक्टिंग डायरेक्टर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
मॉरेल यांनी अल कायदा प्रमुख अयमन अल जवाहिरीच्या व्हिडिओचा उल्लेख करून, यावरून तालिबान त्याला व अल कायदाला अफगाणिस्तानमध्ये आश्रय देत असल्याचे सिद्ध होते, असा दावा केला. अफगाणिस्तानबाबत योग्य निर्णय घेतले नाहीत तर अल कायदा अवघ्या वर्षभरात पुन्हा संघटित होऊ शकते, असा इशाराही मॉरेल यांनी दिला. अफगाणिस्तानात अल कायदाला मिळणारा सुरक्षित आश्रय हा सुरक्षेच्या दृष्टिने दीर्घकालिन धोका आहेे, याकडे सीआयएच्या माजी संचालकांनी लक्ष वेधले. अफगाणिस्तानात आता अमेरिकी लष्कर नसल्याने अल कायदाविरोधात कारवाई करणेही अवघड बनेल, याची जाणीव मॉरेल यांनी यावेळी करून दिली. तालिबानचा विजय व अमेरिकेची माघार यानंतर अफगाणिस्तान पुन्हा एकदा जगभरातील दहशतवाद्यांचे मध्यवर्ती स्थान बनेल. लवकरच अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचा ओघ सुरू झाल्याचे पहायला मिळेल, असे मॉरेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री तसेच सीआयएचे माजी प्रमुख लिऑन पॅनेटा यांनीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. ‘अफगाणिस्तानमधील माघारीवरून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दाखवायला हवी. या चुका स्वीकारून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक असेल ते निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे’, अशा शब्दात पॅनेटा यांनी बायडेन यांना फटकारले. गेल्याच महिन्यात पॅनेटा यांनी, दहशतवादी संघटनांविरोधातील संघर्षासाठी अमेरिकी लष्कराला पुन्हा एकदा अफगाणिस्तानात उतरावे लागेल, असे बजावले होते. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी देखील असाच इशारा दिला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |