अफगाणिस्तानच्या काबुल, जलालाबादमध्ये स्फोट – तीन ठार, २० जखमी

काबुल – शनिवारी सकाळी राजधानी काबुल आणि जलालाबाद शहरात झालेल्या साखळी स्फोटात तिघांचा बळी गेला असून २० जण जखमी झाले. यापैकी जलालाबादमध्ये तीन स्फोट झाले असून ठार झालेल्यांमध्ये तालिबानच्या वरिष्ठ कमांडरचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तालिबानच्या सरकारस्थापनेत सर्वाधिक हिस्सा असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या प्रभावाखाली असलेल्या भागात हे स्फोट झाल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या या स्फोटांचे लक्ष्य हक्कानी नेटवर्क असल्याचे दावे, तालिबानमध्येच अंतर्गत संघर्षाचा भडका उडाल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

जलालाबाद

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील व पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या नांगरहार प्रांतात शनिवारी तीन आयईडी स्फोट झाले. नांगरहारची राजधानी जलालाबादच्या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांच्या मोटारींवर हे हल्ले झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. सकाळी १०.३० ते १२.३० यादरम्यान अंगोर बाघ, रोखान मिना या भागात झालेल्या स्फोटांमध्येच तिघांचा बळी गेला. तर राजधानी काबुलच्या ‘पीडी१३’ भागात झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले.

अफगाणिस्तानातील माध्यमे तालिबानच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे या स्फोटांचे अधिक तपशील उघड झालेले नाहीत. पण शुक्रवारी देखील नांगरहार प्रांताच्या शेरझाद आणि हिसारक जिल्ह्यात तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. नांगरहार प्रांतात ‘आयएस-खोरासन’ने याआधी हल्ले चढविले होते. त्यामुळे या हल्ल्यांमागे आयएस असल्याचे बोलले जाते. पण शनिवारी काबुल व जलालाबादमधील स्फोट हक्कानी नेटवर्कला लक्ष्य करण्यासाठी झाल्याची दाट शक्यताही वर्तविली जाते.

जलालाबाद

राजधानी काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कच्या खलिल हक्कानीकडे आहे. तर शनिवारी स्फोटाचे लक्ष्य ठरलेल्या जलालाबादमध्ये झदरान टोळीचे वर्चस्व आहे व ही टोळी हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीशी संबंधित असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे काबुल व जलालाबादमधील स्फोट हक्कानी नेटवर्कला हादरा देण्यासाठी घडविण्यात आल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात सरकारस्थापनेवरुन झालेल्या वादात, हक्कानी नेटवर्कचा वरिष्ठ कमांडर खलिल हक्कानी याने तालिबानचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर याच्यावर हात उगारल्याचा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने केला. यानंतर बरादार गट आणि हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला व यात दोन्हीकडचे दहशतवादी जखमी झाले. यात मुल्ला बरादरला इजा झाली नाही, पण या संघर्षानंतर संतापलेला मुल्ला बरादर कंदहारमध्ये निघून गेल्याचे अमेरिकी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बरादर आणि हक्कानी गटातील हे वाद समोर आले होते. तालिबानने बरादर जिवंत असल्याचा तसेच तालिबानमध्ये मतभेद नसल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. पण जलालाबादमधील स्फोटांनंतर तालिबानमधील तेढ आता संघर्षात रुपांतरीत होऊ लागल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. पुढच्या काळात हा संघर्ष भयंकर रक्तपात घडविणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info