चीन-पाकिस्तानातील नव्या अणुकरारामुळे जगभरात अण्वस्त्रस्पर्धा, संघर्ष भडकेल

आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकाचा इशारा

जेरूसलेम – ‘चीनने पाकिस्तानसोबत नवा अणुकरार केला आहे. आण्विक साहित्य व तंत्रज्ञानाच्या तस्करीतील पाकिस्तानचा इतिहास पाहता चीनचा हा करार सर्वाधिक धोकादायक ठरतो. यामुळे जगभरात नव्याने अण्वस्त्रस्पर्धा आणि संघर्ष भडकेल’, असा इशारा विख्यात अमेरिकी विश्‍लेषक फॅबियन बॉसार्ट यांनी दिला. भारताच्या लष्करी सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी चीनने पाकिस्तानच्या आण्विक सामर्थ्यात वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचा दावा बॉसार्ट यांनी केला.

८ सप्टेंबर रोजी ‘पाकिस्तान ऍटॉमिक एनर्जी कमिशन’ (पीएईसी) आणि ‘चायना झोंग्युआन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन’ यांच्यात हा करार पार पडला. या करारानुसार, चीन पाकिस्तानला आण्विक तंत्रज्ञान, युरेनियमचे उत्खनन व त्यावरील प्रक्रिया, अणुइंधनाचा पुरवठा करील. चीन पाकिस्तानच्या कराची आणि मुझफ्फरगड या शहरांमध्ये चार अणुप्रकल्प उभारणार आहे. याशिवाय पाकिस्तानच्या इतर अणुप्रकल्पांच्या देखभालीची जबाबदारी चीनकडे असेल. चीनने पाकिस्तानसोबत केलेल्या या अणुकरारावर विश्‍लेषक फॅबियन बॉसार्ट यांनी इस्रायली वर्तमानपत्राशी बोलताना चिंता व्यक्त केली.

‘सेंटर ऑफ पॉलिटिकल अँड फॉरिन अफेअर्स’ या प्रसिद्ध अभ्यासगटाचे संस्थापक व विश्‍लेषक असलेल्या बॉसार्ट यांनी चीन व पाकिस्तानातील अणुकरार जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे बजावले. यासाठी अणुतंत्रज्ञानाच्या तस्करीतील पाकिस्तानचा असलेल्या सहभागाचा उल्लेख बॉसार्ट यांनी केला. पाकिस्तान चीनकडून मिळालेले अणुतंत्रज्ञान, साहित्य व संबंधित गोष्टींची तस्करी करू शकतो, असे बॉसार्ट म्हणाले. अमेरिकी विश्‍लेषकांनी उघड उल्लेख केला नसला तरी पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे जनक मानले जाणारे डॉ. अब्दुल कादीर खान यांनी इराण, उत्तर कोरिया, लिबिया आणि इतर देशांना अणुतंत्रज्ञान व आण्विक साहित्याची तस्करी केली होती. खान यांनी त्याची कबुलीही दिली होती. पाकिस्तानच्या या काळ्याकुट्ट इतिहासाकडे बॉसार्ट यांनी लक्ष वेधले.

वर्षभरापूर्वी गलवान येथील संघर्षामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्याची चीनला पुरेपूर जाणीव झाली आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांमध्ये वाढ करून चीन भारतावरचा लष्करी दबाव वाढविण्याची खेळी करीत असल्याचा दावा बॉसार्ट यांनी केला. अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांमध्ये वाढ झाली तर त्यामुळे या क्षेत्रातच नाही तर जगभरात अण्वस्त्रस्पर्धा पेटेल आणि त्यातून संघर्ष भडकेल, असे बॉसार्ट यांनी बजावले.

चीन व पाकिस्तानमधल्या आण्विक सहकार्य आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप याआधी अमेरिकेने केला होता. दोन्ही देश अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्याचे उल्लंघन करून हे सहकार्य करीत असल्याची बाब याआधीही समोर आली होती. मात्र यावर घेतले जाणारे आक्षेप व आरोप याकडे पाकिस्तान आणि चीननेही दुर्लक्ष केले होते. या आण्विक सहकार्याद्वारे भारतासमोरील धोक्यांमध्ये वाढ करण्याचे एकमेव धोरण पाकिस्तान व चीनने आपल्यासमोर ठेवलेले आहे.

पाकिस्तानचे आण्विक धोरण भारतकेंद्री असल्याचे या देशाने अनेकवार स्पष्ट केले होेते. तसेच भारताने आपल्यावर हल्ला चढविल्यास पाकिस्तान अणुहल्ल्याद्वारे त्याला प्रत्युत्तर देईल, अशा धमक्या पाकिस्तानने अनेकवार दिल्या होत्या. अशा देशाबरोबरील चीनचे आण्विक सहकार्य म्हणजे चीनच्या भारताला लक्ष्य करण्याच्या धोरणाचा भाग ठरतो. फॅबियन बॉसार्ट यांनी केलेले आरोप ही बाब नव्याने अधोरेखित करीत आहे. मात्र अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्याने पाकिस्तानातील दहशतवादी व कट्टरपंथियांचे बळ प्रचंड प्रमाणात वाढले आहे. तेहरिक-ए-तालिबानचे दहशतवादी तर पाकिस्तानची सत्ता काबीज करण्याची भाषा बोलू लागले आहेत. अशा परिस्थितीत अस्थीर झालेल्या पाकिस्तानची आण्विक क्षमता वाढली, तर त्यापासून सार्‍या जगाला धोका संभवतो, हा बॉसार्ट यांनी दिलेला इशारा अतिशय संवेदनशील बाब ठरते. मात्र त्यांच्या या इशार्‍याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमसृष्टीने फारसे लक्ष दिलेले नाही.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info