सिरियातील संघर्षाने साडेतीन लाख जणांचा बळी घेतला – संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार प्रमुखांचा दावा

जीनिव्हा – गेल्या दशकभरापासून सिरियात भडकलेल्या संघर्षात साडेतीन लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सिरियन जनतेबरोबर दहशतवाद्यांचा देखील समावेश असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी दिली. पण ही माहिती अचूक नसून बळींची संख्या याहून कितीतरी अधिक असू शकते, अशी कबुली बॅशलेट यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने सिरियातील बळींची संख्या सहा लाखांहून अधिक असल्याचा दावा केला होता.

सिरियातील संघर्षाने

या वर्षी मार्च महिन्यात सिरियातील गृहयुद्धाला दहा वर्षे पूर्ण झाली. २०१० सालच्या डिसेंबर महिन्यात उत्तर आफ्रिकेच्या त्युनिशियात अरब स्प्रिंगची ठिणगी पडली. त्यानंतर पुढील तीन महिन्यात या अरब स्प्रिंगचे लोण सिरियात पसरून अस्साद राजवटीविरोधात मोठा संघर्ष पेटला होता. सुरुवातीला अस्साद राजवट आणि सिरियतील बंडखोर संघटनांमध्ये हे गृहयुद्ध सुरू होते. पण आयएस व अल कायदासंलग्न दहशतवादी संघटना यात सामील झाल्यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढली.

गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात तीन लाख, ५० हजार, २०९ जणांचा बळी गेल्याचे बॅशलेट यांनी सांगितले. सिरियातील अलेप्पो प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाल्याचा दावा मानवाधिकार संघटनेच्या प्रमुखांनी केला. अलेप्पोमध्ये सिरियन लष्कर आणि बंडखोरांमधील संघर्षात ५१,७३१ जण मारले गेले. यानंतर इदलिब, देर अल-झोर प्रांतातील बळींची संख्या देखील तितकीच चिंताजनक असल्याचे बॅशलेट म्हणाल्या.

सिरियातील संघर्षाने

सिरियातील बळींची ही संख्या राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या हाती आलेल्या माहितीवर अवलंबून आहे. नाव व मृत्यूची नोंदणी झालेल्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती बॅशलेट यांनी दिली. पण सिरियातील बळींची संख्या याहून अधिक असू शकते, असे बॅशेलट यांनी म्हटले आहे. याशिवाय दशकभरातील या संघर्षात बेपत्ता नागरिकांची माहिती आपल्याकडे नसून ही माहिती संकलित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याची घोषणा बॅशलेट यांनी केली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने प्रसिद्ध केलेली माहिती आणि ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने जून महिन्यात सादर केलेली माहिती यात मोठी तफावत आहे. सिरियातील गेल्या दशकभरातील संघर्षात सहा लाखाहून अधिकजणांचा बळी गेल्याचे ब्रिटनस्थित संघटनेने म्हटले होते. सिरियातील जवळपास पाच लाख नोंदणीकृत कागदपत्रांच्या हवाल्याने ब्रिटिश संघटनेने हा दावा केला होता.

२०१५ साली सिरियातील संघर्षात सर्वाधिक बळी गेले होते. तर २०१४ सालानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने सिरियातील रक्तपाताबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे टाळले होते. पण संयुक्त राष्ट्रसंघ आणि ब्रिटनस्थित संघटना सांगत आहेत, त्याहून अधिक प्रमाणात सिरियात जीवितहानी झाल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर या संघर्षामुळे ६७ लाख विस्थापित तर ६६ लाख निर्वासित झाल्याचे दावे याआधी प्रसिद्ध करण्यात आले होते.

सिरियातील हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. या देशाच्या सुमारे ६४ टक्के भूभागावरच अस्साद राजवटीचे नियंत्रण आहे. तर सिरियन सरकारविरोधात लढणार्‍या ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’च्या ताब्यात उत्तर व ईशान्य सिरियाचा सुमारे २५ टक्के इतका भूभाग आहे. तुर्कीसंलग्न गटाने सिरियाच्या नऊ टक्के तर आयएस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात एक टक्का इतका भूभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info