अमेरिका, दक्षिण कोरियाला लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्र चाचणीचा सराव केला

- उत्तर कोरियन लष्कराचा इशारा

सेऊल – अमेरिका व दक्षिण कोरियातील हवाईतळ, ऑपरेशन कमांड सेंटर तसेच इतर ठिकाणांना लक्ष्य करताना कुठलीही गय केली जाणार नाही. गेल्या आठवड्यापासून आत्तापर्यंत घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे याचाच सराव करण्यात आला, असा इशारा उत्तर कोरियाच्या लष्कराने दिला. अमेरिका व दक्षिण कोरियाच्या युद्धसरावाने दिलेल्या चिथावणीमुळे हा सराव करावा लागल्याचा दावा उत्तर कोरियन लष्कराने केला. दरम्यान, जपानने आयोजित केलेल्या ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्यू’मध्ये दक्षिण कोरियाच्या विनाशिकांनी सहभाग घेतला होता.

सराव

गेल्या आठवड्यात अमेरिका व दक्षिण कोरियाच्या हवाईदलांमधील २४० लढाऊ विमानांचा व्हिजिलंट स्टॉर्म सराव सुरू झाला. अमेरिकेने आपल्याविरोधात अणुयुद्धाची पटकथा लिहिली असून त्याचीच तयारी या युद्धसरावाद्वारे सुरू असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला होता. तसेच अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकावण्यासाठी उत्तर कोरियाने लघू व दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचा सपाटा लावला. यामध्ये आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा देखील समावेश होता.

या क्षेपणास्त्र चाचणीद्वारे आपण अमेरिका व दक्षिण कोरियातील हवाईतळ, लष्करी ठिकाणे व विमानांना लक्ष्य करण्याचा सराव घेतल्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला. यापुढेही अमेरिका, दक्षिण कोरियाच्या चिथावणीखोर युद्धसरावांना अशाचप्रकारे उत्तर दिले जाईल, असेही उत्तर कोरियन लष्कराने धमकावले. तर उत्तर कोरियाच्या या इशाऱ्यावर अमेरिका व दक्षिण कोरियाने टीका केली. तसेच उत्तर कोरियाच्या या आक्रमकतेला योग्य त्या कारवाईने उत्तर दिले जाईल, असे अमेरिकेने बजावले आहे.

दरम्यान, रविवारी जपानच्या नौदलाने ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्यू’चे आयोजन केले होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडाबरोबर दक्षिण कोरियाच्या विनाशिकांनी देखील सहभाग घेतला. सात वर्षानंतर पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या विनाशिका अशा नौदल कार्यक्रमात सामील झाल्या होत्या.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info