डॉलरचा शस्त्रासारखा वापर करणारी अमेरिकाच त्याचे महत्त्व संपवित आहे – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

मॉस्को – परदेशी राजवटींवर निर्बंध लादण्यासाठी शस्त्रासारखा वापर करून अमेरिकाच डॉलरचे राखीव चलन म्हणून असलेले महत्त्व संपवून टाकत आहे, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. अमेरिका अतिरिक्त डॉलर्सची छपाई करून, कर्जाचा बोजा वाढवित आहे आणि त्याचवेळी देशात महागाईला प्रोत्साहन देत आहे, असा आरोपही पुतिन यांनी केला. गेल्याच महिन्यात, ‘बँक ऑफ रशिया’च्या गव्हर्नर एल्विरा नबिउलिना यांनी, रशियासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अमेरिकी डॉलरचा वापर करण्याकडे असणारा कल कमी झाल्याकडे लक्ष वेधले.

शस्त्रासारखा वापर

‘निर्बंध लादण्यासाठी डॉलरचा शस्त्रासारखा वापर करून अमेरिका खूप मोठी चूक करीत आहे. या चुकीमुळे निर्बंध लादलेल्या उत्पादनांसाठी डॉलरचा वापर करता येत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड देणार्‍या रशियासारख्या देशांपुढे दुसरा पर्याय उरत नाही. आम्हाला दुसर्‍या चलनाचा वापर करून व्यवहार पूर्ण करावे लागतात. रशिया अजूनही काही अंशी इंधनव्यापारासाठी डॉलरचा वापर करीत आहे. पण अमेरिकी यंत्रणांचे धोरण कायम राहिले, तर कदाचित रशियाला काहीच करावे लागणार नाही. अमेरिका स्वतःच डॉलरचे महत्त्व संपवून टाकेल’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले.

अमेरिकेचे अनेक सहकारी देशही डॉलरचे साठे व त्यातून होणारे व्यवहारांचे प्रमाण कमी करीत आहेत, याकडे रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. यामागे केवळ निर्बंध हेच कारण नाही तर अमेरिकेकडून सुरू असलेली डॉलरची बेसुमार छपाई, कर्जाचा वाढता बोजा आणि डॉलरचे मूल्य कमी करण्याच्या हालचाली यासारख्या बाबीही त्यासाठी कारणीभूत असल्याचे पुतिन यांनी सांगितले. अमेरिकी यंत्रणांच्या धोरणामुळे अमेरिकेत महागाई अभूतपूर्व प्रमाणात वाढत असल्याचेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

अमेरिकेवरील वाढत्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करताना, अनेक जण यापुढे अमेरिका अवाढव्य कर्जाचे काय करणार असा सवाल करीत असल्याचा दावा पुतिन यांनी केला. अमेरिकी यंत्रणा डॉलरचे मूल्य कमी करण्यासाठी काही वेगळ्या हालचाली करु शकतात, असे संकेत त्यांनी यावेळी दिले. ‘स्थानिक पातळीवर राजकीय लाभ उचलण्यासाठी अमेरिकी नेतृत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर राखीव चलन म्हणून असलेला डॉलरचा प्रभाव कमी करीत चालले आहेत. यामुळे अमेरिकेच्याच धोरणात्मक व आर्थिक हितसंबंधांची हानी होत आहे. हे म्हणजे ज्या फांदीवर बसला आहात तीच कापण्याचा प्रयत्न आहे’, असा टोला पुतिन यांनी यावेळी लगावला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी ‘डिडॉलरायझेशन’ची प्रक्रिया सुरू केली होती. अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. रशियाच्या इंधन कंपन्या आपल्या प्रमुख भागीदार देशांबरोबर रुबल व इतर स्थानिक चलनात व्यवहार करीत आहेत. यात चीन, युरोपिय देश तसेच इराणसारख्या देशांचा समावेश आहे. त्याचवेळी, रशियन सरकारकडे असलेल्या राखीव गंगाजळीतून उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील अमेरिकी डॉलरचा हिस्सा शून्यावर आणण्यात आला आहे.

रशियाची परकीय गंगाजळी व सोन्याचे साठे विक्रमी स्तरावर 

शस्त्रासारखा वापर

मॉस्को – रशियाकडील परकीय गंगाजळी ६१८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून ही ऐतिहासिक घटना असल्याची माहिती रशियाच्या संसदेने दिली आहे. गेल्या साडेसहा वर्षात रशियाच्या परकीय गंगाजळीत तब्बल २३५ अब्ज डॉलर्सची भर पडली, असे रशियन संसदेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्वाधिक परकीय गंगाजळी असणार्‍या देशांच्या यादीत रशियाने पाचव्या क्रमांकावर झेप घेतल्याचे संसदेने स्पष्ट केले. रशियाने आपल्या गंगाजळीतील सोन्याचा हिस्साही वाढविला असून त्याचे प्रमाण २३ टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती या अहवालात आहे. तर रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या माहितीनुसार, या देशात २,२९५ टन इतका राखीव सोन्याचा साठा आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info