इराणच्या प्रत्युत्तरामुळे इस्रायलचे ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होईल

इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याची धमकी

तेहरान – ‘इराणवर हल्ला चढविण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची तरतूद करणार्‍या इस्रायलने, इराणच्या धक्कादायक प्रत्युत्तरामुळे होणार्‍या नुकसानाची दुरूस्ती करण्यासाठी ट्रिलियन डॉलर्सची तरतूद करावी’, अशी धमकी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखनी यांनी दिली. गेल्या आठवड्यात इस्रायलने इराणवर हल्ला चढविण्यासाठी दीड अब्ज डॉलर्सची विशेष तरतूद केली होती. त्यावर इराणने ही जहाल प्रतिक्रिया दिलेली आहे.

ट्रिलियन डॉलर्स

इस्रायलचे नफ्ताली बेनेट यांचे सरकार व लष्कर गेल्या काही दिवसांपासून इराणवर हल्ल्याचे संकेत देत आहेत. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या आठवड्यात इराणवर हल्ल्यासाठी दीड अब्ज डॉलर्सच्या तरतुदीची घोषणा केली. या अंतर्गत इस्रायल लढाऊ विमाने, ड्रोन्सची खरेदी करणार असल्याचा दावा केला जातो. तर संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी इस्रायली हवाईदलाला इराणच्या अणुप्रकल्पांवर जोरदार हल्ले चढविण्याचा सराव करण्याचे आदेश दिले. यामुळे इस्रायलने इराणवर हवाई हल्ले चढविण्याची तयारी केल्याचा दावा इस्रायली तसेच पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखनी यांनी हवाई हल्ल्यांची तयारी करणार्‍या इस्रायलला धमकावले. इस्रायलने इराणवर हल्ला चढविलाच तर त्याचे भीषण आर्थिक परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असा इशारा शामखनी यांनी सोशल मीडियातून दिला. इराणचे हल्ले इस्रायलला हादरवून सोडणारे असतील, असा दावा इराणचे माजी नौदल अधिकारी शामखनी यांनी केला.

ट्रिलियन डॉलर्स

गेल्या काही दिवसांपासून इराणने देशभरात हवाई सराव सुरू केला असून यामध्ये लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच मानवरहित टेहळणी तसेच हल्लेखोर विमाने सहभागी झाली आहेत. इराणचा हा हवाईसराव इस्रायलला धमकाविणारा असल्याचे बोलले जाते. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल व इराणमध्ये छुपे युद्ध सुरू असल्याचा दावा केला जातो. इराणच्या अणुप्रकल्पांमध्ये झालेल्या संशयास्पद स्फोटांमागे इस्रायल असल्याचा आरोप इराण करीत आहे. तर रेड सी ते पर्शियन आखातात आपल्या व्यापारी जहाजांवर होणार्‍या हल्ल्यांमागे इराण असल्याचा ठपका इस्रायलने ठेवला होता.

दरम्यान, इराणची राजकीय तसेच लष्करी व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण असणारे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलशी सहकार्य करणार्‍या अरब देशांना धमकावले. इस्रायलशी सहकार्य करुन अरब देशांनी मोठी चूक केली असून अरब देशांनी वेळीच या सहकार्यातून माघार घ्यावी, असा इशारा खामेनी यांनी दिला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info