बीजिंग – चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारे ऊर्जा संकट अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. इंधनाची वाढलेली मागणी, वाढलेले दर व त्याचवेळेला निर्माण झालेली टंचाई यामुळे चीनच्या अनेक प्रांतांना वीजटंचाईचा फटका बसला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी चीनमधील उद्योगांनी जनरेटर्सचा आधार घेतला होता. मात्र डिझेलवर चालणार्या या जनरेटर्सच्या वापरामुळे चीनमध्ये आता डिझेलची टंचाई जाणवू लागली असून त्यावर उपाय म्हणून डिझेलचे रेशनिंग केले जात आहे. मात्र या रेशनिंगचा फटका कच्चा माल तसेच तयार उत्पादनांची वाहतूक करणार्या वाहनांना बसत असून याचे तीव्र परिणाम पुरवठा साखळी व अर्थव्यवस्थेवर होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येतेे.
गेल्या काही महिन्यांपासून चीनला वीजटंचाईचा मोठा फटका बसतो आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्या उत्पादनक्षेत्रात याचे पडसाद उमटत असून अनेक कारखाने बंद पडले आहेत. वीजपुरवठा होणार्या भागांमधील अनेक कारखान्यांनी जनरेटर्सच्या सहाय्याने काम चालू ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. या जनरेटर्ससाठी डिझेलचा वापर होत असल्याने चीनमधील डिझेलची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा अंदाज चिनी यंत्रणांना न आल्याने डिझेलचे उत्पादन मर्यादित राहिले आहे. मात्र मागणी वाढल्याने अनेक इंधन पंपांवर डिझेलच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे.
पुरवठा कमी होत असल्याने डिझेलचे रेशनिंग सुरू झाले आहे. हेबेई प्रांतात ट्रकचालकांना पंपावर फक्त १०० लिटर डिझेल देण्यात येत आहे. इतर प्रांतांमध्ये हेच प्रमाण जेमतेम २५ लिटर आहे. काही भागांमध्ये ट्रकचालकांना डिझेल भरण्यासाठी अनेक दिवस थांबावे लागत असल्याची माहिती सोशल मीडियासह इतर माध्यमांमधून समोर आली आहे. इंधनाचा पुरवठा करणार्या काही पंपांवर डिझेल भरण्यासाठी १०० ते ३०० युआन अतिरिक्त भरावे लागत असल्याच्या तक्रारीही ट्रकचालकांकडून करण्यात आल्या आहेत.
डिझेलच्या या रेशनिंगचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत. चीनच्या अंतर्गत पुरवठा साखळीत डिझेलवर चालणार्या ट्रक व इतर वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र रेशनिंगमुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट फटका उत्पादनक्षेत्राला बसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक कारखान्यांना कच्चा माल मिळण्यास उशिर होत असून त्यामुळे उत्पादन थंडावले आहे. डिझेलचे रेशनिंग सुरू झाल्याने जनरेटर्सच्या वापरावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादने तयार होण्यासही वेळ लागत आहे. वाहतूक करणार्या ट्रक्सना पुरेसे इंधन उपलब्ध होत नसल्याने तयार झालेली उत्पादने रवाना करण्याच्या प्रक्रियेतही अडचणी आल्या आहेत.
वीजेच्या टंचाईमुळे चीनचे उत्पादन क्षेत्र व उद्योग आधीच संकटात सापडला होता. त्यात आता डिझेलच्या रेशनिंगची भर पडल्याने संकटाची तीव्रता अधिकच वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचे परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेसह जागतिक पुरवठा साखळीवर दिसून येतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका कोरोनाच्या साथीतून पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करणार्या जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असा दावा विश्लेषकांनी केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली इंधनाच्या टंचाईची स्थिती काही महिन्यांकरता कायम राहू शकते, असे वृत्त ‘ऑईलप्राईस’ या वेबसाईटने दिले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |