युद्ध जिंकण्यासाठी मोठ्या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को/पॅरिस – ‘1945 साली अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. या हल्ल्यांनंतर जपानने शरणागती पत्करली होती आणि दुसरे महायुद्ध संपले होते. युद्ध जिंकण्यासाठी मोठ्या शहरांवर हल्ले करण्याची गरज नसते हे या घटनेतून दिसून येते’, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या संभाषणात पुतिन यांनी अणुहल्ल्यांबाबत हे वक्तव्य करून पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य ते युक्रेनमध्ये ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन’चा वापर करतील, असे संकेत देणारे ठरते, असा दावा माध्यमांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सदर वक्तव्य अत्यंत गांभीर्याने घेतल्याची माहिती फ्रेंच सूत्रांनी दिली.

युद्ध जिंकण्यासाठी

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन तसेच रशियातील इतर नेत्यांनी सातत्याने अणुहल्ल्यांसंदर्भात वक्तव्ये केल्याचे समोर आले होते. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले होते. काही आठवड्यांपूर्वी रशियाच्या आण्विक सामर्थ्याचा हवाला देत आपण याबाबत करीत असलेली वक्तव्ये पोकळ समजू नयेत, असेही पुतिन यांनी बजावले होते. गेल्या आठवड्यात रशियात पार पडलेल्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी युक्रेनवरील अणुहल्ल्याबाबत वक्तव्ये केल्याचे वृत्त पाश्चिमात्य माध्यमांनी दिले होते.

युद्ध जिंकण्यासाठी

अमेरिकेनेही युरोपिय देशांमध्ये प्रगत अण्वस्त्रे तैनात करण्याच्या हालचालींना वेग दिला होता. युरोपात झालेल्या नाटोच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत अमेरिकेने नव्या अणुबॉम्ब्सच्या तैनातीचे संकेत दिले होते. या हालचालींवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ‘अमेरिकी तैनातीच्या पार्श्वभूमीवर रशियालाही आपल्या धोरणांमध्ये बदल करणे भाग पडेल’, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झांडर ग्रुश्को यांनी दिला होता.

युद्ध जिंकण्यासाठी

या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दुसऱ्या महायुद्धातील अणुहल्ल्याचा हवाला देऊन वक्तव्य करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेने 1945 साली 6 व 9 ऑगस्टला जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले होते. या भीषण अणुहल्ल्यात जपानमधील जवळपास दोन लाख नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर जपानने शरणागती जाहीर केली होती. पुतिन यांनी या सर्वांचा हवाला देऊन केलेले वक्तव्य धोक्याचे संकेत असल्याचे मत मॅक्रॉन यांनी व्यक्त केल्याचे फ्रेंच सूत्रांनी म्हटले आहे.

रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या वक्तव्यातून युक्रेनमध्ये अणुहल्ला करण्याबाबत संदेश दिल्याचा दावाही माध्यमांकडून करण्यात आला. पुतिन पूर्व युक्रेनमध्ये टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपनचा वापर करतील, असेही माध्यमांनी म्हटले आहे. रशियाकडे सुमारे दोन हजार ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ असल्याचे सांगण्यात येते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info