तेल अविव – ‘जेरूसलेममध्ये दुसर्या अमेरिकन उच्चायुक्तालयाची आवश्यकता नाही. कारण जेरूसलेम ही केवळ इस्रायलचीच राजधानी आहे. इस्रायलने आपली ही भूमिका अमेरिकेकडे परखडपणे मांडली आहे’, असे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी ठणकावले. त्याचबरोबर अमेरिकेला पॅलेस्टाईनसाठी उच्चायुक्तालय सुरू करायचेच असेल तर त्यांनी ते वेस्ट बँकमध्ये सुरू करावे, अशा शब्दात पंतप्रधान बेनेट यांनी अमेरिकेसमोर वेगळा पर्याय ठेवला.
२०१८ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा दूतावास तेल अविवमधून जेरूसलेममध्ये हलविला होता. तर जेरूसलेममधील पॅलेस्टाईनसाठीचे उच्चायुक्तालय बंद केले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे इस्रायलने जोरदार स्वागत केले, तर पॅलेस्टाईनचे सरकार आणि पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी ट्रम्प यांच्यावर जबरदस्त टीका केली होती. पूर्व जेरूसलेम ही पॅलेस्टाईनची राजधानी असल्याचा दावा करणार्या पॅलेस्टाईनने अमेरिकेबरोबरच्या संबंधातून माघार घेतली होती.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांचा सदर निर्णय मागे घेतला जार्ईल व पॅलेस्टाईनचे उच्चायुक्तालय पुन्हा जेरूसलेममध्ये सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यावेळी केली होती. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी काही आठवड्यांपूर्वी जेरूसलेममध्ये पॅलेस्टाईनचे उच्चाययुक्तालय पुन्हा कार्यान्वित होईल, असे जाहीर केले होते.
शनिवारी तेल अविवमध्ये माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी जेरूसलेम ही इस्रायलचीच राजधानी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे इस्रायलखेरीज दुसर्या कुठल्याही राष्ट्रासाठीचे उच्चायुक्तालय जेरूसलेममध्ये मान्य करता येणार नाही, असे बेनेट यांनी ठणकावून सांगितले.
‘अमेरिकेसमोर आपली ही भूमिका मांडली असून पॅलेस्टिनीसाठीचे नेतृत्व करणारे उच्चायुक्तालय जेरूसलेममध्ये प्रस्थापित होऊ देणार नाही’, पंतप्रधान बेनेट म्हणाले. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी देखील पंतप्रधान बेनेट यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच पॅलेस्टिनींना उच्चायुक्तालय उभारायचे असेल तर त्यांनी ते वेस्ट बँकच्या रामल्ला, अबू दिस या भागात सुरू करावे, असे पंतप्रधान बेनेट आणि परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी सुचविले.
इस्रायलच्या नेत्यांनी केलेल्या या विधानांवर जेरूसलेममधील अमेरिकेच्या राजदूताने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तर पॅलेस्टिनी नेत्यांनी इस्रायलचे पंतप्रधान व परराष्ट्रमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला. इस्रायल आजही पॅलेस्टाईनवर अतिक्रमण करण्याच्याच भूमिकेत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, अशी टीका पॅलेस्टिनी नेत्यांनी केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |