मॉस्को/वॉशिंग्टन – रशियाच्या सीमेपासून अवघ्या २० किलोमीटर्सच्या अंतरावर अमेरिकेच्या बॉम्बर्सनी अण्वस्त्रहल्ल्याचा सराव केला, असा आरोप रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी केला. चीनच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर शोईगु यांनी हा आरोप करताना, सदर सराव अणुयुद्धासाठी रशियाच्या तयारीची माहिती घेण्यासाठी होता, असा दावाही केला. अमेरिकेच्या या वाढत्या धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशिया व चीन परस्परांमधील संरक्षण सहकार्य वाढवित असल्याकडेही रशियन संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. रशियाचे संरक्षणमंत्री अमेरिकेच्या कारवायांचा मुद्दा मांडत असतानाच रशिया व अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
युक्रेन तसेच बेलारुसच्या मुद्यावरून रशिया व पाश्चात्य देशांमधील तणाव हळुहळू चिघळत असल्याचे समोर येत आहे. रशियाने बेलारुसला दिलेले समर्थन व वाढते संरक्षणसहाय्य आणि युक्रेनच्या सीमेनजिकची व्यापक लष्करी तैनाती यामुळे अमेरिका व युरोपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेसह युरोपातील नाटो सदस्य देशांनी युक्रेननजिक आपल्या लष्करी हालचलींना वेग दिला आहे. अमेरिकेसह नाटोची लढाऊ विमाने तसेच युद्धनौका सातत्याने युक्रेननजिकच्या परिसरात तैनात असून सराव तसेच गस्त मोहिमही सुरू आहे. अमेरिका व नाटोच्या या वाढत्या हालचालींमुळे रशियाची नाराजी वाढत चालल्याचे सांगण्यात येते.
संरक्षणमंत्री शोईगु यांनी केलेला आरोप त्याचाच भाग दिसत आहे. ‘रशियाच्या सीमांनजिक अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमानांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या बॉम्बर विमानांनी रशियन हद्दीजवळ सुमारे ३० मोहिमा राबविल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अडीच पटींनी जास्त आहे. ग्लोबल थंडर या सरावात अमेरिकेची १० बॉम्बर विमाने एकाच वेळी रशियाच्या पूर्व व पश्चिम सीमेनजिक होती. ही बॉम्बर्स रशियाविरोधात अण्वस्त्रहल्ल्याचा सराव करीत होती.
अमेरिकची बॉम्बर्स रशियाच्या सीमेपासून अवघ्या २० किलोमीटरच्या अंतरापर्यंत आली होती’, असा आरोप रशियन संरक्षणमंत्र्यांनी केला. अमेरिकी बॉम्बर्सचा हा सराव अणुयुद्धादरम्यान रशियाची तयारी किती आहे, याचा अंदाज घेण्यासाठी होता असा दावाही शोईगु यांनी केला आहे. अमेरिकेच्या या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रशिया व चीन परस्परांमधील संरक्षणसहकार्य वाढवित असल्याकडे रशियन संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यापूर्वी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत रशिया व चीनमध्ये संरक्षण सहकार्य करार झाल्याचे समोर आले आहे. या करारानुसार दोन्ही देश संयुक्त संरक्षणसरावांची व्याप्ती तसेच संख्या वाढविणार आहेत. सदर करार २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, रशियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल व्हॅलरी गेरासिमोव्ह व अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंगळवारी ही बोलणी पार पडली असून सुरक्षाविषयक मुद्यांवर चर्चा झाल्याचे निवेदन दोन्ही देशांकडून प्रसिद्ध करण्यात आले. युक्रेन मुद्यावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |