तैवानवर हल्ला चढवून चीन आर्थिक आत्मघात करून घेईल

- जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांचा इशारा

आत्मघात

टोकिओ/तैपेई/बीजिंग – चीनने तैवानवर आक्रमण केलेच तर जपान व अमेरिका या युद्धात खेचले जातील. त्यामुळे तैवानवरील हल्ला हा चीनसाठी आर्थिक पातळीवरील आत्मघात ठरेल, असा चीनचा थरकाप उडविणारा इशारा जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीन-तैवान क्षेत्रातील परिस्थितीबाबत गैरसमजातून पावले उचलू नयेत, असेही ऍबे यांनी बजावले. जपानच्या माजी पंतप्रधानांच्या या इशार्‍यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ऍबे यांनी तैवानच्या मुद्यावर बेजबाबदार वक्तव्ये केली असून वन चायना धोरणाचे उल्लंघन केले आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केली.

‘तैवानविरोधातील लष्करी साहस हा चीनसाठी आर्थिकदृष्ट्या आत्मघाताचा मार्ग ठरेल. चीन व तैवानमध्ये शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित होणे हाच एकमेव पर्याय आहे. आपण सर्वांनी याच मुद्यावर ठाम रहायला हवे’, असे जपानचे माजी पंतप्रधान ऍबे यांनी बजावले. तैवानवरील लष्करी आक्रमण हा जपानसाठी मोठा धोका ठरतो. तैवानमध्ये समस्या निर्माण झाल्यास जपानही संकटात सापडेल व ही बाब जपान-अमेरिका आघाडीसाठीही अडचणीची ठरु शकते, याकडेही शिंझो ऍबे यांनी लक्ष वेधले.

‘तैवानच्या मुद्यावर चुकीचे पाऊल उचलू नका याची शी जिनपिंग व कम्युनिस्ट पार्टीला सातत्याने आठवण करून देणे, ही जगातील लोकशाहीवादी देशांची जबाबदारी आहे. चीन हा प्रचंड मोठा देश आहे आणि त्यातील अनेक गोष्टी उर्वरित जगाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे चीनने संघर्षाचे पाऊल उचलले तर ते त्याच्याच अर्थव्यवस्थेची जबरदस्त हानी करणारे ठरेल, हे चीनने लक्षात घ्यायला हवे’, असा इशारा जपानच्या माजी पंतप्रधानांनी दिला.

चीनकडून तैवान व जपानविरोधात कारवाया सुरू असून याची जटीलता वाढत चालली आहे. त्यामुळे शांतता व युद्ध यातील रेषा धूसर बनल्याचे ऍबे यांनी लक्ष वेधले. अशा काळात जपान व तैवानने लोकशाही तसेच स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘मजबूत, समृद्ध आणि स्वातंत्र्य व मानवाधिकारांची हमी देणारा तैवान जपानच्या हितसंबंधांसाठी महत्त्वाचा आहे. हीच बाब सर्व जगाच्याही हिताची आहे’, याची जाणीव माजी पंतप्रधान ऍबे यांनी यावेळी करून दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवानचा सहभाग अधिकाधिक वाढण्यासाठी जपानचे पूर्ण समर्थन राहिल, असा दावाही त्यांनी केला.

चीनची वाढती आक्रमकता व वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर जपानने उघडपणे तैवानची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात जपानच्या पंतप्रधानांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी चीनच्या विरोधात ठामपणे तैवानच्या पाठी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. चीनने तैवानवर ताबा मिळविल्यास त्याचे पुढचे लक्ष्य जपान असू शकतो, असेही बजावण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जपानच्या माजी पंतप्रधानांनी तैवानचा मुद्दा चीनच्या अर्थव्यवस्थेशी जोडून दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info