रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणातून तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडेल

- युक्रेनच्या मंत्र्यांचा इशारा

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणातून तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडेल

किव्ह/मॉस्को – रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण फक्त युक्रेनपुरतेच मर्यादित राहणार नाही, तर त्यातून व्यापक संघर्ष सुरू होऊन तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा युक्रेनच्या मंत्र्यांनी दिला आहे. सध्याच्या भूराजकीय स्थितीचा विचार करता ही बाब शक्य आहे असे युक्रेनच्या ‘व्हेटरन्स मिनिस्टर’ युलिआ लॅपुटिना यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनीही मोठ्या संघर्षाबाबत इशारा दिला होता. युक्रेन हा रशियाविरोधी कारवायांसाठी नवा तळ बनणार नाही याची हमी द्या, अन्यथा मोठ्या संघर्षाचा धोका पत्करा, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी बजावले होते.

रशियाने युक्रेनच्या सीमेनजिक जवळपास एक लाख जवान तैनात केल्याचे दावे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. या दाव्यांबरोबरच रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती देणारे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. यावरून पाश्‍चात्य देशांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला असून रशियाला गंभीर परिणामांची जाणीव करून देण्यात येत आहेत. रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकीही उडत असून दोन्ही बाजू परस्परांना इशारे-प्रतिइशारे देत आहे. युक्रेनच्या मंत्र्यांनी दिलेला इशाराही त्याचाच भाग दिसतो.

‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमणाचे आदेश दिले तर त्याचे परिणाम फक्त युक्रेनपुरते मर्यादित राहणार नसून ते दूरगामी असतील. रशियाचा हल्ला फक्त युक्रेनमध्ये रोखता येणार नाही. युक्रेननंतर रशिया बाल्कन देशांनाही लक्ष्य करु शकतो, याची जाणीव असायला हवी. सर्बियाच्या माध्यमातून रशिया बाल्कन क्षेत्रातील परिस्थितीला चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. संघर्षाची व्याप्ती अधिक वाढून त्यातून तिसरे महायुद्ध भडकू शकते’, असा इशारा युक्रेनच्या ‘व्हेटरन्स मिनिस्टर’ युलिआ लॅपुटिना यांनी दिला. सध्याच्या भूराजकीय स्थितीचा विचार करता हे घडणे शक्य आहे, असा दावाही त्यांनी पुढे केला.

गुरुवारी झालेल्या युरोपिय महासंघाच्या बैठकीतही युक्रेनबाबत असलेल्या रशियाच्या धोक्यावर प्राधान्याने चर्चा झाली. काही युरोपिय नेत्यांनी रशियाच्या आक्रमणाचा धोका युक्रेनच्या पलिकडेही असल्याचा दावा ठोकला आहे. युरोपमध्ये गेल्या तीन दशकांमधील सर्वात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष गितानस नॉसेडा यांनी केला. दरम्यान, युक्रेनच्या मुद्यावर रशिया व अमेरिकेदरम्यान पुन्हा चर्चा होऊ शकते, असे संकेत रशियाने दिले आहेत. गेल्याच आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. उलट या चर्चेनंतर दोन्ही बाजूंकडून अधिक आक्रमक सूर लावण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर रशियाने दिलेले नव्या चर्चेचे संकेत महत्त्वाचे ठरतात.

यापूर्वी २०१४ साली रशियाने युक्रेनवर आक्रमण करून क्रिमिआ प्रांत ताब्यात घेतला होता. तसेच रशियासमर्थक बंडखोर गटांनी पूर्व युक्रेनमधील डोन्बास नावाने ओळखण्यात येणार्‍या काही भागावर ताबा मिळविला होता. त्यानंतर गेली सात वर्षे सातत्याने या क्षेत्रात चकमकी व संघर्ष सुरू असून आतापर्यंत सुमारे यात १५ हजार जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info