रशियाने बेलारुसमध्ये ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ धाडले

मॉस्को/मिन्स्क – युक्रेनवरून रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव चिघळत असतानाच, रशियाने बेलारुसमध्ये दोन ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ धाडल्याचे समोर आले आहे. हे बॉम्बर्स बेलारुसच्या हवाईदलाबरोबर गस्त तसेच सरावासाठी पाठविण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. मात्र काही विश्‍लेषकांनी बेलारुसमध्ये सातत्याने पाठविण्यात येणारे बॉम्बर्स युक्रेनवरील आक्रमणाच्या तयारीचा भाग असू शकतो, असा दावा केला आहे. रशियन बॉम्बर्स येण्यापूर्वी बेलारुसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, आपला देश रशियाची अण्वस्त्रे तैनात करण्यास तयार असल्याचे घोषित केले होते.

‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’

रशियाने बेलारुसला दिलेले समर्थन व वाढते संरक्षणसहाय्य आणि युक्रेनच्या सीमेनजिकची व्यापक लष्करी तैनाती यामुळे पाश्‍चात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेसह युरोपातील नाटो सदस्य देशांनी युक्रेननजिक आपल्या लष्करी हालचालींना वेग दिला आहे. अमेरिकेसह नाटोची लढाऊ विमाने तसेच युद्धनौका सातत्याने युक्रेननजिकच्या परिसरात तैनात असून सराव तसेच गस्त मोहिमही सुरू आहे. अमेरिका व नाटोच्या या वाढत्या हालचालींमुळे रशियाची नाराजी वाढते आहे. या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाकडून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. बेलारुसमध्ये पाठविण्यात आलेले बॉम्बर्सही त्याचाच भाग असल्याचे मानले जाते.

रशियाने शनिवारी आपले दोन ‘टीयु-२२एम३’ हे ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर बॉम्बर्स’ बेलारुसमध्ये धाडले होते. या बॉम्बर्सनी बेलारुसच्या हवाईहद्दीत गस्त घालून सरावही केला. या सरावात बेलारुसच्या हवाईदलातील ‘एसयु-३०’ ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. रशियाने आपले बॉम्बर्स बेलारुसमध्ये पाठविण्याची महिन्याभरातील ही तिसरी वेळ ठरली आहे. रशियाकडून बॉम्बर्स पाठविण्यापूर्वी बेलारुसच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य समोर आले होते.

‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’

‘बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या हद्दीत रशियाची अण्वस्त्रे तैनात करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहोत. हे नाटोकडून पोलंडमध्ये होणार्‍या क्षेपणास्त्र तैनातीला उत्तर असेल’, असे बेलारुसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमिर मेकेई यांनी म्हटले आहे. बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या महिन्यात रशियन अण्वस्त्रांच्या तैनातीचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्‍वभूमीवर, रशियन बॉम्बर्सच्या बेलारुसमधील वाढत्या फेर्‍या लक्ष वेधून घेणार्‍या ठरत आहेत.

‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’

दोन महिन्यांपूर्वी युक्रेनमधील संसद सदस्यांनी, रशिया बेलारुसचा वापर करून युक्रेनवर हल्ला करु शकते, असा इशारा दिला होता. लुकाशेन्को यांनी आपली राजवट टिकविण्यासाठी पुतिन यांच्याशी युक्रेनवर आक्रमण करण्याचे ‘डील’ केल्याचा आरोप युक्रेनमधील सत्ताधारी पक्षाचे संसद सदस्य येगॉर चेर्नेव्ह यांनी केला होता. युक्रेनवर थेट हल्ला चढविण्याचा धोका रशिया पत्करणार नाही, त्यामुळे बेलारुसच्या माध्यमातून हल्ल्याची शक्यता जास्त आहे, असेही चेर्नेव्ह यांनी म्हटले आहे. या इशार्‍यापूर्वी तसेच त्यानंतरही रशिया व बेलारुसमध्ये संयुक्त लष्करी सराव पार पडले असून, ‘एस-४००’सारखी हवाईसुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचेही संकेत देण्यात येत आहेत.

बेलारुसमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर केलेल्या कारवाईवरून पाश्‍चात्य देशांनी लुकाशेन्को यांच्यावर निर्बंध लादले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाची मदत घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारुसबरोबर संरक्षण तसेच व्यापारी करार केले आहेत. याच्या बदल्यात बेलारुसमधील रशियन सैन्याची तैनाती वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info