युरोपात कोरोनाचे नवे वादळ येत आहे

- आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

व्हिएन्ना – युरोपिय देशांमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून साथीचे नवे वादळ येताना दिसत आहे, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी दिला. युरोपियन क्षेत्रातील ३८ देशांमध्ये नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण आढळले असून चार देशांमध्ये या व्हेरिअंटचा संसर्ग इतर व्हेरिअंट्सवर वर्चस्व गाजविणारा (डॉमिनंट स्ट्रेन) ठरल्याचा इशाराही ‘डब्ल्यूएचओ’चे तज्ज्ञ हॅन्स क्लुग यांनी दिला. जर्मनीतही कोरोनाचा फैलाव वाढण्यास सुरुवात झाली असून कोरोना नाताळची सुट्टी घेणार नाही, या शब्दात नवे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी बजावले आहे. या पार्श्‍वभूमीवर जर्मनी, नेदरलॅण्डस्, पोर्तुगाल व स्वीडन या देशांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली आहे.

नवे वादळ

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’ची व्याप्ती वेगाने वाढत आहे. अमेरिका व युरोपमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. जर्मनी, ब्रिटन, डेन्मार्क, रशिया यासारख्या देशांमध्ये दरदिवशी आढळणार्‍या रुग्णसंख्येचे नवे रेकॉर्ड नोंदविले जात आहेत. आतापर्यंत जगातील सुमारे १०० देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने युरोपमधील ओमिक्रॉनच्या संसर्गावरून नवा ऍलर्ट दिला आहे.

युरोपिय देशांमध्ये आतापर्यंत सुमारे नऊ कोटी रुग्ण आढळले असून कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या १६ लाखांनजिक पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात युरोपात २६ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे बळी जाणार्‍यांची संख्या सुमारे ३० हजार इतकी आहे. ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या फैलावानंतर युरोपात रुग्णसंख्या पुन्हा प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. ही वाढ म्हणजे युरोपवर धडकणारे कोरोनाचे नवे वादळ असून युरोपिय देशांमधील आरोग्य यंत्रणा यात उद्ध्वस्त होऊ शकतात, असा इशारा वैद्यकतज्ज्ञ हॅन्स क्लुग यांनी दिला.

नवे वादळ

युरोपातील आघाडीच्या देशांमध्ये याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. जर्मनीचे नवे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी देशात कठोर निर्बंधांची घोषणा केली असून लसीकरणासाठी आवाहन केले आहे. ‘कोरोनाची नवी लाट सुरू असताना जर्मनीला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोना नाताळची सुट्टी घेणार नाही. लवकरच कोरोनाच्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसू शकते’, असे शोल्झ यांनी बजावले. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांनीही नव्या निर्बंधांची घोषणा करताना, यंदाचा नाताळ नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नाही, असा इशारा दिला आहे.

फ्रान्समध्ये प्रतिदिन आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या ७० हजारांनजिक पोहोचली असून जानेवारी महिन्यापर्यंत ओमिक्रॉन देशात ‘डॉमिनंट स्ट्रेन’ झालेला असेल, असे असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. डेन्मार्कमध्ये २४ तासांमध्ये १३,५५८ रुग्ण आढळले असून त्यातील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉन व्हेरिअंटचे असल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info