मॉस्को/वॉशिंग्टन – अंतराळातील ‘लो ऑर्बिट सॅटेलाईट्स’, अण्वस्त्रे व ‘ऑर्बिटल हायपरसोनिक वेपन्स’ना लक्ष्य करणारी ‘एस-५५०’ ही क्षेपणास्त्र यंत्रणा रशियन संरक्षणदलांमध्ये तैनात करण्यात आली आहे. रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. अंतराळक्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विश्लेषकांनी रशियाच्या नव्या यंत्रणेचा उल्लेख ‘स्टार वॉर्स मिसाईल’ असा केला असून नवी यंत्रणा अंतराळातील शस्त्रस्पर्धा अधिकच भडकविणारी ठरेल, अशी चिंता व्यक्त केली.
रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी गेल्या महिन्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत क्षेपणास्त्र यंत्रणांचा विकास व तैनातीचा उल्लेख केला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘एस-३५०’, ‘एस-५००’ व ‘एस-५५०’ या क्षेपणास्त्र यंत्रणांची संरक्षणदलातील तैनाती वाढविण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे शोईगु यांनी सांगितले होते. यापैकी ‘एस-३५०’ व ‘एस-५००’ रशियन संरक्षणदलात आधीच तैनात असून ‘एस-५५०’च्या चाचण्या सुरू असल्याचे मानले जात होते. काही रशियन माध्यमांनी ही यंत्रणा २०२५ सालापर्यंत कार्यरत होईल, असे दावे केले होते.
मात्र बुधवारी ‘तास’ या सरकारी वृत्तसंस्थेने ‘एस-५५०’ रशियन संरक्षणदलांमध्ये सामील झाल्याचे वृत्त देऊन नवा धक्का दिला. ‘एस-५५० क्षेपणास्त्र यंत्रणेने सर्व आवश्यक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. एस-५५०ची पहिली तुकडी रशियन संरक्षणदलात तैनात झाली आहे’, असे ‘तास’ने आपल्या बातमीत म्हटले आहे. ‘एस-५५०’ ही आंतरखंडीय अण्वस्त्रांचा वेध घेऊ शकणारी पहिली ‘मोबाईल मिसाईल सिस्टिम’ असल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आला आहे. रशियाच्या कोणत्याही भागात ही यंत्रणा तैनात करता येऊ शकते, असेही रशियन सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मात्र ‘एस-५५०’ ही प्रत्यक्षात अंतराळातील संघर्षासाठी विकसित करण्यात आल्याचे मानले जाते. या यंत्रणेसाठी वापरण्यात आलेली क्षेपणास्त्रे अंतराळात फिरणार्या उपग्रहांचा तसेच हायपरसोनिक वेपन्सचाही वेध घेऊ शकतात. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून रशियाने आपली अंतराळयुद्धासाठीची सज्जता अधिकच भक्कम केल्याचे दिसत आहे. गेल्याच महिन्यात रशियाने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी करून खळबळ उडवली होती. ही चाचणी ‘एस-५५०’साठी वापरण्यात येणार्या क्षेपणास्त्राची होती, असे सांगण्यात येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |