अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी ‘सेल्फ डिस्ट्रॉइंग सॅटेलाईट’ तयार केल्याचा रशियाचा दावा

अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी ‘सेल्फ डिस्ट्रॉइंग सॅटेलाईट’ तयार केल्याचा रशियाचा दावा

मॉस्को – अंतराळात सोडलेल्या उपग्रहाची नियोजित मोहीम संपल्यानंतर आपोआप नष्ट होण्याची क्षमता असणारा ‘सेल्फ डिस्ट्रॉईंग सॅटेलाईट’ विकसित केल्याचा दावा रशियाने केला आहे. या अनोख्या संशोधनामुळे अंतराळातील घातक कचर्‍याची समस्या सोडविण्यास मदत होईल, असे रशियन अंतराळसंस्था ‘रॉस्कॉस्मॉस’ने म्हटले आहे. सध्या अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत तब्बल ८ हजार ४०० टन कचरा फिरत असून त्याचा फटका पृथ्वीवरील दळणवळण, दूरसंचार, संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना बसू शकतो, असा इशारा वारंवार देण्यात आला आहे.

रशियाने गेल्या काही महिन्यात अंतराळक्षेत्रातील हालचालींना चांगलाच वेग दिल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, अंतराळक्षेत्रासाठी स्थापन केलेल्या ‘एरोस्पेस फोर्सेस’वर अधिक लक्ष केंद्रित करून हे क्षेत्र विकसित करण्यावर भर द्यावा, असे आदेश दिले होते. त्यात ‘हायपरसोनिक मिसाईल डिफेन्स सिस्टिम’वर खास लक्ष देण्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले होते.

त्यापूर्वी अंतराळात अधिकाधिक दूरवर संशोधन करण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली असून त्यात रशियाही सहभागी झाल्याचा दावा रशियन अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगझिन यांनी केला होता. रशिया आपल्या महत्त्वाकांक्षी अंतराळमोहिमांसाठी ‘अंगारा-ए५’ नावाचे ‘स्पेस रॉकेट’ विकसित करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. रोगोझिन यांनी रशियाच्या संभाव्य अंतराळमोहिमांमध्ये, २०३० सालापर्यंत चंद्रावर मानवी अंतराळवीर पाठविण्याची योजना तसेच चंद्रावर स्वतंत्र कायमस्वरुपी तळ उभारण्याचे संकेत दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर ‘सेल्फ डिस्ट्रॉईंग सॅटेलाईट’ विकसित केल्याचा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. अमेरिकेसह चीन, रशिया, भारत, जपान व युरोपिय देश अंतराळक्षेत्रात आघाडीवर असल्याचे मानले जाते. जपान तसेच युरोपिय देशांनी अंतराळातील वाढत्या कचर्‍याचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्यावर उपाय शोधण्यासाठी काही मोहिमाही आखल्या आहेत. जपानकडून यासंदर्भात अंतराळातील कचरा एकत्र करणारी ‘स्पेस सिस्टिम’ विकसित केल्याचा दावाही करण्यात आला होता.

मात्र रशियाने केलेला दावा यापेक्षा वेगळा असून अंतराळात सोडलेला उपग्रह मोहीम संपल्यावर आपोआप नष्ट होणार आहे. हा उपग्रह तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले घटक अंतराळात आपोआप विरुन जातील, असे रशियन दाव्यात सांगण्यात आले. त्यासाठीचे ‘पेटंट’देखील रशियन अवकाशसंस्थेने सादर केले आहे. उपग्रहासाठी वापरलेल्या घटकांचे ‘घन अवस्थे’तून थेट वायूत रुपांतर होईल, असे या पेटंटमध्ये सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळक्षेत्र ही युद्धाची नवी रणभूमी ठरेल, असे इशारे दिले जात असतानाच रशियाकडून समोर आलेले नवे संशोधन लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info