कझाकस्तानात सत्तापालट करण्याचा परकीय हस्तकांचा प्रयत्न होता

- कझाकस्तान व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

सत्तापालट

नूर सुल्तान/मॉस्को – गेल्या आठवड्यात कझाकस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पेटलेल्या हिंसाचारामागे सुनियोजित कारस्थान होते. कझाकस्तानमध्ये सत्तापालट घडविण्याचा डाव परकीय हस्तकांनी आखला होता. यासाठी कझाकस्तानात हायब्रिड दहशतवादी हल्ला घडविला गेला. 2014 साली युक्रेनमध्ये घडविलेल्या उठावाप्रमाणे कझाकस्तानातही हिंसाचार घडवायचा होता, असे गंभीर आरोप कझाकस्तान व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केले आहेत. थेट नाव घेतले नसले तरी यामागे अमेरिका असल्याचे संकेत कझाकस्तान तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष देत आहेत.

किमान 164 जणांचा बळी घेणाऱ्या कझाकस्तानमधील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी सोमवारी रशियाच्या नेतृत्वाखाली माजी सोव्हिएत देशांच्या ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएटीओ`ची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी ही इंधनदरवाढीविरोधातील ही निदर्शने उत्स्फूर्त नव्हती, असा दावा केला.

सत्तापालट

कझाकस्तानमध्ये अराजक माजविण्यासाठी परदेशी दहशतवादी आमच्या देशात घुसले आहेत. हे सशस्त्र दहशतवादी घात करण्याच्या तयारीत होते आणि संधी साधून त्यांनी हिंसाचार घडवून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हे दहशतवादी सत्तापालट करण्याच्या तयारीत होते`, असा आरोप राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी सीएसटीओच्या बैठकीत केला. तर देशांतर्गत तसेच देशाबाहेरील गट एकत्र आले असून त्यांनी दहशतवाद्यांचा वापर करून ‘हायब्रिड टेररिस्ट अटॅक` केल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी 2014 साली युक्रेनचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यान्कोविच यांच्याविरोधात झालेल्या हल्ल्याची आठवण करुन दिली. रशियासमर्थक यान्कोविच यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सशस्त्र बंडखोरांनी युक्रेनच्या पार्लमेंटवर हल्ला चढविला होता. यानंतर उसळलेल्या हिंसाचारात सव्वाशेजणांचा बळी गेला तर जवळपास सातशे जण बेपत्ता झाले होते. यानंतर युक्रेनमध्ये सत्तापालट होऊन रशियाविरोधी सरकार सत्तेवर आले होते, याकडे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लक्ष वेधले. कझाकस्तानातील हिंसाचार देखील असाच पूर्वनियोजित होता, असा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला.

पाकिस्तानी व अफगाणी कट्टरपंथियांनी दंगल पेटवली 

सत्तापालट

अल्माटी – कझाकस्तानच्या अल्माटीमध्ये झालेल्या भीषण हिंसाचारामागे पाकिस्तानातील तब्लिगी तसेच अफगाणिस्तानातील कट्टरपंथी गट असल्याची बातमी समोर येत आहे. रशियन सुरक्षा यंत्रणेशी संबंधित अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.

अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेतलेले कट्टरपंथी कझाकस्तानात उपस्थित आहेत. तर पाकिस्तानातील कट्टरपंथिय संघटना मध्य आशियामध्ये आपला जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. किरगिझिस्तानमार्गे कझाकस्तानच्या अल्माटीमध्ये प्रवेश करून या दोन्ही गटांनी या भागात हिंसाचार घडविल्याची शक्यता वर्तविण्यात येते. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर दोन्ही देशांमधील कट्टरपंथियांना बळ मिळाले आहे व आशियाई देश यामुळे धोक्यात आल्याचे कझाकस्तानातील दंगलीमुळे स्पष्ट झाले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info