अमेरिकेसह युरोप व चीनमध्ये कोरोनाची तीव्रता वाढली

-14 लाखांहून अधिक रुग्णांसह अमेरिकेत रुग्णसंख्येचा नवा रेकॉर्ड

वॉशिंग्टन/लंडन – अमेरिकेसह युरोप व चीनमध्ये कोरोनाची तीव्रता पुन्हा वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेतील रुग्णसंख्येने सलग दुसऱ्या आठवड्यात 10 लाखांचा उच्चांक ओलांडला आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या तसेच दगावणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर येत्या दोन महिन्यात युरोपातील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग फैलावलेला असेल, असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन`ने (डब्ल्यूएचओ) दिला. दरम्यान, चीनने तिसऱ्या शहरात लॉकडाऊनची घोषणा केली असून अमेरिकेतून येणाऱ्या प्रवासी विमानांच्या फेऱ्यांवर निर्बंध लादले आहेत.

कोरोनाची तीव्रता

ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या फैलावामुळे जगातील अनेक देशांमध्ये भयावह स्थिती निर्माण होऊ लागली आहे. जगातील आघाडीची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णसंख्येने नवे उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेत 24 तासांच्या अवधीत 10 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. या आठवड्यात हा रेकॉर्डही मागे पडला असून 24 तासांच्या अवधीत 14 लाख, 86 हजार रुग्णांची भर पडली आहे. या वाढीनंतर अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्या सहा कोटींवर गेली आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येतही भर पडली असून प्रतिदिन आकडेवारी सव्वा लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या 1,900च्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्या आठ लाख 38 हजारांहून अधिक झाली आहे.

अमेरिकेपाठोपाठ युरोपातही रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. ब्रिटन व फ्रान्सपाठोपाठ स्पेनमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी स्पेनमध्ये तब्बल 2 लाख, 92 हजार रुग्णांची नोंद झाली. हा युरोपात 24 तासांमध्ये आढळलेल्या रुग्णसंख्येचा रेकॉर्ड ठरला आहे. ब्रिटनमध्येही दररोज एक लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. फ्रान्समधील रुग्णसंख्याही सुमारे लाखाच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. युरोपात रुग्णसंख्येचा वाढता कल कायम राहिल्यास येत्या दोन महिन्यात युरोपातील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला असेल, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ`ने दिला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात युरोपात कोरोनाचे 70 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, चीनने अनिआंग नावाच्या शहरात ‘लॉकडाऊन`ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर, चीनमध्ये जवळपास दोन कोटी लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये अडकल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यात 23 डिसेंबरला 1.3 कोटी लोकसंख्या असलेल्या शिआनमध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर गेल्या सोमवारी हेनान प्रांतातील युझोउ शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ हेनान प्रांतातील 55 लाख लोकसंख्येच्या शहरात लॉकडाऊन जाहीर झाला आहे.

या शहरात ओमिक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्याने निर्बंध लादल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर चीनने अमेरिकेतून येणाऱ्या प्रवासी विमानांच्या फेऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. गेल्या सात दिवसात अमेरिकेतून येणाऱ्या तसेच अमेरिकेत जाणाऱ्या सुमारे 60 प्रवासी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट पूर्वीच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षा सौम्य दिसत असला तरी जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे मोठे परिणाम होतील, असे भाकित अर्थतज्ज्ञांनी वर्तविले आहे. या वर्षभरात आर्थिक विकासदरासह, शेअर बाजार, नोकरीच्या संधी व जागतिक पुरवठा साखळीला मोठे फटके बसतील, असे अमेरिकेतील ‘नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी`तील तज्ज्ञांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info