युक्रेनचे युद्ध न रोखल्यास तिसरे महायुद्ध भडकेल

- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ‘रशिया आणि युक्रेनचे युद्ध त्वरित थांबवून या दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या नाहीत, तर तिसरे महायुद्ध भडकेल. यानंतर आपल्या या ग्रहावर काहीही शिल्लक राहणार नाही’, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. रशिया व युक्रेनमध्ये शांतीप्रक्रिया सुरू झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी करून माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या युद्धाला बायडेन प्रशासनाचा मूर्खपणा जबाबदार असल्याची घणाघाती टीका केली. 2020 च्या निवडणुकीत आपण पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आलो असतो, तर रशिया आणि युक्रेनचे युद्ध पेटलेच नसते, असा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

तिसरे महायुद्ध भडकेल

अमेरिकेच्या नेवाडा राज्यातील मिंडेन शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘सेव्ह अमेरिका’ रॅलीमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलत होते. पुढच्या महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाविरोधात जबरदस्त प्रचारमोहीम छेडली आहे. त्याला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला असून यामुळे बायडेन प्रशासन अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. विशेषतः रशिया व युक्रेनचे युद्ध बायडेन प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणांमुळे पेटल्याचा आरोप करून माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याचे भयंकर परिणाम अमेरिकेसह साऱ्या जगाला भोगावे लागतील, असे इशारे अनेकवार दिले होते. रशिया-युक्रेन युद्ध वेळीच थांबले नाही, तर त्यातून तिसरे महायुद्ध पेट घेईल, असा इशारा ट्रम्प यांनी याआधीही दिला होता.

तिसरे महायुद्ध भडकेल

शनिवारी मिंडेन येथील रॅलीमध्ये बोलताना देखील ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धामुळे तिसरे महायुद्ध पेट घेईल, अशी चिंता व्यक्त केली. बायडेन प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही स्थिती ओढावल्याचे सांगून ट्रम्प यांनी या युद्धाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यापेक्षा बायडेन यांची धोरणेच जबाबदार असल्याची बाब अमेरिकी जनतेच्या लक्षात आणून दिली आहे. ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही नेत्यांनी अमेरिका-नाटोच्या चिथावणीमुळे युक्रेनचे युद्ध भडकल्याचा दावा केला होता. युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर रशियाने युक्रेनमध्ये आपले सैन्य घुसविले, या घटनाक्रमाकडे पोप फ्रान्सिस व इतर नेत्यांनी लक्ष वेधले होते.

अमेरिकेचे विरोधी पक्षनेते देखील युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या पुतिन यांच्यावर टीका करीत असताना, बायडेन प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणांमुळेच युक्रेनचे युद्ध पेटल्याचा ठपका ठेवत आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचाही समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशिया आपल्या संरक्षणासाठी अणुहल्ला चढविताना कचरणार नाही, असा इशारा दिल्यानंतर त्याचे फार मोठे पडसाद जगभरात उमटले होते. त्यानंतर बायडेन यांच्यावरील टीकेची धार अधिकच वाढली होती. युक्रेनच्या युद्धाला सर्वस्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनच जबाबदार असल्याचा बायडेन प्रशासनाकडून केला जात असलेला दावा, आता अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही स्वीकारला जात नसल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

पुढच्या महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत बायडेन प्रशासनाने युक्रेनच्या युद्धाबाबत स्वीकारलेल्या भूमिकेविरोधात प्रतिक्रिया येईल, अशी दाट शक्यता यामुळे समोर येऊ लागली आहे. अशा परिस्थिती माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणांवर घणाघाती टीका करून याविरोधात अमेरिकी जनमत जागृत करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रचारमोहीमेला फार मोठे महत्त्व आल्याचे दिसते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info