किव्ह/मॉस्को – शुक्रवारी युक्रेनवर मोठा सायबरहल्ला झाल्याचे उघड झाले. या सायबरहल्ल्याचा फटका युक्रेन सरकारशी निगडित जवळपास ७० वेबसाईट्सना बसला असून त्यावर पोलिश व रशियन भाषेतील संदेश झळकले आहेत. यामागे रशियाचा हात असावा, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केला आहे. मात्र त्याला ठोस दुजोरा देण्यात आलेला नाही. यापूवी २०१५ व २०१७ साली रशियाने युक्रेनवर मोठे सायबरहल्ले चढविल्याचे उघड झाले होते.
शुक्रवारी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयासह विविध दूतावासांच्या वेबसाईट्स, सिक्युरिटी ऍण्ड डिफेन्स कौन्सिल तसेच शिक्षण विभाग व आपत्कालिन विभागाच्या वेबसाईट्सना लक्ष्य करण्यात आले. यातील काही वेबसाईट्सवर रशियन व पोलिश भाषेत संदेश झळकले. त्यात वेबसाईट्सवर असलेली युक्रेनच्या नागरिकांची माहिती मिळविण्यात आल्याचे व ती प्रसिद्ध करण्याचा इशारा देण्यात आला. युक्रेनच्या सुरक्षायंत्रणा व सायबर यंत्रणांनी हा दावा फेटाळून लावला. कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती हल्ल्यात गहाळ झालेली नसल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.
‘सायबरहल्ल्यामागे नक्की कोणाचा हात आहे हे लगेच सांगता येणार नाही मात्र युक्रेनवर सायबरहल्ले चढविण्याचा रशियाचा इतिहास सर्वांना माहित आहे’, या शब्दात हल्ल्यामागे रशिया असू शकतो, असे संकेत परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते ओलेग निकोलेन्को यांनी दिले. रशियाने आपल्यावर करण्यात आलेले आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. युक्रेनवरील सायबरहल्ल्यावर नाटो व युरोपिय महासंघाकडून प्रतिक्रिया उमटली आहे.
‘नव्या सायबरहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नाटो युक्रेनला सर्व प्रकारचे सहाय्य पुरवेल. येत्या काही दिवसात नाटो व युक्रेनमध्ये सायबरसुरक्षेच्या मुद्यावर करार करण्यात येणार आहे. त्यात युक्रेनला नाटोच्या सायबरसुरक्षाविषयक क्षमतांचा वापर करण्याच्या सुविधेचा समावेश आहे’, अशी माहिती नाटोचे महासचिव जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी दिली. युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी, युक्रेनला सहकार्य करण्यासाठी महासंघातील सदस्य देशांनी हालचाली सुरू केल्याचे म्हटले आहे. हल्ला कोणी केला याबाबत ठोस पुरावे नसले, तरी याबाबत कल्पना सहज करता येऊ शकते, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता रशियाकडे निर्देश केला.
दरम्यान, रशियाने आपल्या मागण्यांच्या बाबतीत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘पाश्चात्य देशांचा प्रतिसाद मिळण्यासाठी आम्ही अनिश्चित काळ थांबू शकत नाही. रशियाची सहनशीलता संपत चालली आहे’, असा खरमरीत इशारा परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. अमेरिका व नाटो पुढील आठवड्यापर्यंत लेखी उत्तर देईल, अशी अपेक्षाही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. नाटोने युक्रेनला सदस्य बनवू नये व पूर्व युरोपातील वाढती संरक्षणतैनाती थांबवावी, अशा मागण्या रशियाकडून करण्यात आल्या आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |