रशियाच्या ‘एन्गेल्स’ व ‘रायझान’ तळांवर युक्रेनचा ड्रोन हल्ला

- पाच जणांचा बळी, दोन बॉम्बर्स निकामी झाल्याचे दावे

मॉस्को/किव्ह – रशियातील ‘एन्गेल्स’ व ‘रायझान’ या दोन तळांवर ड्रोन हल्ले झाले असून किमान पाच जणांचा बळी गेला आहे. ‘एन्गेल्स’ तळावर झालेल्या हल्ल्यात दोन रशियन बॉम्बर्स विमानांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तर रायझान तळावर मोठ्या फ्युएल टँकरचा स्फोट होऊन प्रचंड आग भडकली आहे. हे दोन्ही हल्ले युक्रेनने केल्याचे सांगण्यात येत असले तरी युक्रेनी लष्कराने अधिकृतरित्या त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. युक्रेनकडून होणाऱ्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचे वृत्त समोर आले आहे.

‘एन्गेल्स’ व ‘रायझान’

काही दिवसांपूर्वी लाटव्हियाचे परराष्ट्रमंत्री एडगर्स रिन्केव्हिक्स यांनी, युक्रेनला रशियन भूमीत हल्ले करण्याची परवानगी द्यायला हवी अशी मागणी केली होती. त्यानंतर एकाच दिवसात दोन रशियन तळांवर झालेले हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात. हल्ले झालेले दोन्ही तळ रशिया-युक्रेन सीमेपासून शेकडो किलोमीटर्स अंतरावर आहेत. ‘एन्गेल्स’ या तळावर युक्रेनवरील हल्ल्यांसाठी बॉम्बर्स विमाने तैनात केलेली आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, युक्रेनने रशियन भूमीत खोलवर हल्ले सुरू करण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे.

‘एन्गेल्स’ व ‘रायझान’

सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही तळांवर हल्ले झाल्याचे सांगण्यात येते. ‘एन्गेल्स’ तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मोठा आगीचा भडका उडाल्याचे व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्समध्ये दिसत आहे. या हल्ल्यात रशियाच्या ‘टीयू-६०’ या बॉम्बर्स विमानांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर काही रशियन जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. रायझान तळावरही प्रचंड आग भडकली असून तीन जणांचा जागीच बळी गेल्याचे सांगण्यात येते. या तळावरही युक्रेनवरील हल्ल्यांसाठी शस्त्रसामुग्री व इतर तैनातीचा साठा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘एन्गेल्स’ व ‘रायझान’

युक्रेनने यापूर्वी क्रिमिआ, बलगोरोद, ब्रिआंस्क अशा रशियन हद्दीतील लष्करी तळांवर हल्ले चढविले होते. मात्र हे सर्व तळ रशिया-युक्रेन सीमेनजिक आहेत. मात्र एन्गेल्ससारखा तळ युक्रेनी सीमेपासून तब्बल ७५० किलोमीटर्सवर आहे. रशियन हद्दीच्या इतक्या आत असणाऱ्या तळावरील हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. दोन्ही तळांवरील हल्ल्यांसाठी ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. युक्रेनकडून या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

युक्रेनच्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याची माहिती समोर आली. सोमवारी राजधानी किव्हसह अनेक शहरांमध्ये ‘एअर रेड सायरन्स’ वाजल्याचे युक्रेनी माध्यमांनी सांगितले. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये हानी झाल्याची अथवा इतर स्वरुपाची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, येत्या काही महिन्यात कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता कमी होईल, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख ॲव्हरिल हेन्स यांनी केला. युद्धक्षेत्रातील हालचाली काही प्रमाणात मंद होत असल्याचे आतापासूनच दिसत आहे, असेही हेन्स यांनी सांगितले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info