दुबई – येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबू धाबीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला. युएईच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने हा हल्ला यशस्वीरित्या भेदला. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग युएईच्या दौर्यावर असताना हौथींनी हा हल्ला चढविला. तसेच यापुढेही युएईवर हल्ले होत राहतील, अशी धमकी हौथी बंडखोरांनी दिली. गेल्या दहा दिवसांमध्ये हौथी बंडखोरांचे युएईवरील हल्ले वाढले आहेत. इस्रायल आणि युएईतील सहकार्य वाढत असताना, हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांमध्ये झालेली वाढ लक्षवेधी ठरते.
युएईच्या सरकारसंलग्न वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हौथी बंडखोरांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला. पण क्षेपणास्त्र टप्प्यात आल्यानंतर त्याला यशस्वीरित्या भेदल्याचे युएईच्या वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत म्हटले आहे. या कारवाईत क्षेपणास्त्राच्या ठिकर्या उडाल्या असून यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. येमेनच्या अल-ज्वाफ भागातून हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला होता.
या हल्ल्यानंतर तासाभरात हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच युएईची राजधानी अबू धाबी आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र दुबई आपल्या निशाण्यावर होते, असे हौथी बंडखोर संघटनेचा प्रवक्ता याह्या सरी याने जाहीर केले. या हल्ल्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र व ड्रोन्सचा वापर केल्याचे सरीने सांगितले. तसेच येत्या काळातही युएईच्या प्रमुख शहरांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी हौथी संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. युएईच्या सुरक्षा यंत्रणांनी फक्त क्षेपणास्त्राची माहिती दिली असून दुबईवरील ड्रोन्स हल्लाबाबत तपशील जाहीर केलेले नाहीत. हौथी बंडखोरांनी हल्ला चढविला, त्यावेळी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष हर्झोग दुबईमध्येच होते.
राष्ट्राध्यक्ष हर्झोग सोमवारी दुबई एक्स्पो प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या प्रदर्शनात इस्रायलच्या कंपन्यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर, हौथी बंडखोरांनी हल्ला चढविल्याचे दिसत आहे. युएई आणि इस्रायल यांच्यातील सहकार्य वाढत असताना, हौथी बंडखोर क्षेपणास्त्र व ड्रोन्सचे हल्ले चढवून युएईला इशारा दिला आहे.
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग हे दोन दिवसांच्या युएई भेटीवर आहेत. इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी युएईला दिलेली ही पहिली ऐतिहासिक भेट ठरते. या भेटीत राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी युएईला सुरक्षाविषयक सहाय्य पुरविण्यासाठी इस्रायल सज्ज असल्याचे आश्वासन दिले. राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी या सहाय्याचे तपशील जाहीर केले नसले तरी, युएईला हवाई सुरक्षा पुरविण्याची तयारी इस्रायल करीत असल्याचे दिसते. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दहा दिवसांपूर्वीच याचे संकेत दिले होते.
दरम्यान, गेल्या वर्षी बायडेन प्रशासनाने आखाती देशांमध्ये तैनात असलेली हवाई सुरक्षा यंत्रणा मागे घेतली आहे. तसेच युएईचे लष्करी सहाय्यही बायडेन प्रशासनाने रोखले आहे. त्याचा परिणाम सौदी तसेच युएईच्या हवाई सुरक्षेवर होत आहे. युएई आणि सौदी अरेबिया यांच्याकडील हवाई सुरक्षा यंत्रणेचे इंटरसेप्टर्स येत्या काळात संपणार असून त्यांना नव्या इंटरसेप्टर्सची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्यात युएईने दक्षिण कोरियाबरोबर यासंबंधी करार केला होता. युएई भारताकडूनही इंटरसेप्टर्सच्या खरेदीबाबत चर्चा करीत असल्याच्या बातम्या येत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |