अमेरिकेबरोबर अणुकरार करूनही इराण इस्रायलपासून आपला बचाव करू शकणार नाही

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

जेरुसलेम – ‘व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या चर्चेद्वारे अमेरिका आणि इराण मध्ये अणुकरार संपन्न झाला तरी इस्रायल त्याला बांधील नसेल. यापुढे फार काळ इराण इस्रायलच्या कारवाईपासून आपला बचाव करू शकणार नाही. दहशतवादी संघटनाद्वारे या क्षेत्रातील देशांमध्ये आपले पाय पसरणार्‍या इराणरुपी ऑक्टोपसचे डोके लवकरच ठेवण्यात येईल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. अमेरिका आणि इराणमध्ये लवकरच अणुकरार संपन्न होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

बचाव करू शकणार नाही, अणुकरार

गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलने आपल्या संरक्षण सज्जतेचा वेग वाढविला आहे. नव्या क्षमतेची रॉकेट क्षेपणास्त्रे त्याचबरोबर इंधनवाहू विमानांची खरेदी यावर इस्रायल भर देत आहे. तर काही तासांपूर्वी इस्रायलच्या पंतप्रधानांनी लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तैनातीची घोषणा केली. त्याचबरोबर पुढील बारा वर्षांमध्ये इस्रायलचे सकल राष्ट्रीय उत्पादन एक ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे ध्येय आपल्यासमोर असल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी म्हटले होते. इस्रायल आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरच लष्करी व धोरणात्मकदृष्ट्या सज्ज राहू शकेल, असा दावा पंतप्रधान बेनेट केला होता. त्याचबरोबर इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणार्‍या इराणबाबतही त्यांनी महत्त्वाची विधाने केली होती. आखातातील वृत्तसंस्थेशी बोलताना पंतप्रधान बेनेट यांनी इराणबाबतची आपली भूमिका मांडली.

यासाठी इस्रायलच्या पंतप्रधानांनी २००६ साली लेबेनॉन मध्ये लढल्या गेलेल्या ३४ दिवसांच्या संघर्षाचा दाखला दिला. या संघर्षात पंतप्रधान बेनेट इस्रायली लष्कराच्या विशेष तुकडीचे अधिकारी म्हणून काम करीत होते. ‘लेबनॉनमधील संघर्षात आम्ही हिजबुल्लाहचा सामना करीत होतो. या दहशतवादी संघटनेला इराणमधून फंडिंग मिळत होते. इराणचे आयातुल्ला दूर बसून इस्रायल विरोधात संघर्ष लढत होते. पण यापुढे इराण इस्रायलच्या कारवाईपासून जास्त काळ दूर राहणार नाही’, असे पंतप्रधान बेनेट यांनी बजावले. त्याचबरोबर इराणची तुलना ऑक्टोपस या सागरी प्राण्याशी करून हिजबुल्लाह, हमास, हौथी या दहशतवादी संघटना आखातात पसरलेल्या ऑक्टोपसचे पाय असल्याचा दावा बेनेट यांनी केला.

बचाव करू शकणार नाही, अणुकरार

आतापर्यंत इस्रायल इराण नामक ऑक्टोपसच्या पायांबरोबर अर्थात हमास हिजबुल्लाह यांच्याबरोबर संघर्ष करत होता. पण यापुढे इस्रायल ऑक्टोपसच्या डोक्यावरच घाव घालणार आहे, असा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी केला. इराणची राजवट अतिशय भ्रष्ट असून जनता या राजवटीवर संतापलेली आहे. इराणची अर्थव्यवस्था कोसळत आहे, देशभरात पाण्याची टंचाई आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन इस्रायलने इराणवर हल्ला चढवायला हवा, याचाही दाखला बेनेट यांनी दिला. याद्वारे त्यांनी इराणमध्ये बंड घडविण्याचे संकेत दिल्याची शक्यता समोर येत आहे.

व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीविषयी पंतप्रधान बेनेट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबर अणुकरार केला तरी यामुळे इस्रायलच्या इराणबाबतच्या भूमिकेत बदल होणार नाही, असे बेनेट यांनी ठणकावून सांगितले.

‘या अणुकरारानंतर ही अमेरिका इस्रायलचा धोरणात्मक मित्र देश असेल. पण जग हे बदलत चालले आहे. आपण नव्या युगात जगत आहोत आणि येथे कोणा एकावरच सारे काही अवलंबून नसते. बायडेन प्रशासन आणि डेमोक्रॅटस यांच्याबरोबर संबंध सुधारण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले आहे. पण इस्रायलाने इतर देशांबरोबरील सहकार्यही वाढवायला हवे. सायबर, तंत्रज्ञान, हवामान बदल आणि संशोधन या क्षेत्रात इस्रायल इतर देशांसाठी महत्त्वाचा सहकारी देश ठरू शकतो’, असे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी बायडेन प्रशासनालाही संदेश दिला आहे.

मात्र हे सारे सुरू असताना इस्रायल सीरियामधील इराणच्या हालचालींकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, असा सज्जड इशाराही इस्रायली पंतप्रधानांनी दिला आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info