सुरक्षेसाठी मित्रदेशांना हवे तेव्हा सहाय्य पुरविण्यास इस्रायल तयार

- बाहरिनच्या ऐतिहासिक दौर्‍यावर इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा

मनामा – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट बाहरिनच्या ऐतिहासिक भेटीवर आहेत. सोमवारी रात्री पंतप्रधान बेनेट बाहरिनमध्ये दाखल झाले असून लवकरच ते राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतील. अब्राहम करारात सहभागी असलेल्या इस्रायल आणि अरब देशांमधील सहकार्य औपचारिक स्तरावर न ठेवता, ते सामरिक स्तरावर वाढविण्याचा प्रस्ताव पंतप्रधान बेनेट बाहरिनच्या राष्ट्रप्रमुखांना देणार आहेत. इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या धोक्याविरोधात सहकार्य वाढविण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बाहरिन भेटीवर असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

बाहरिनच्या ऐतिहासिक

बाहरिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेण्याआधी पंतप्रधान बेनेट यांनी स्थानिक दैनिकाला मुलाखत दिली. यामध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या भेटीचे कारण स्पष्ट केले. ‘इस्रायल आणि बाहरिनसमोर एकच आव्हान आहे. तर मग त्याचा एकजुटीने सामना करण्यास काय हरकत आहे? आपण एकत्र येऊन इराण आणि इराणसमर्थक गटांशी दिवसरात्र संघर्ष करू. या क्षेत्रात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायल आपल्या मित्रदेशांना हवे तेव्हा सहाय्य करण्यासाठी तयार आहे’, अशी घोषणा पंतप्रधान बेनेट यांनी केली.

‘आपल्या जनतेसाठी झटणार्‍या आणि त्यांची सुरक्षा व क्षेत्रीय शांततेसाठी प्रयत्न करणार्‍या देशांना नष्ट करण्याचे इराणचे ध्येय आहे. यासाठी इराण दहशतवादी संघटनांना समर्थन देत असून या रक्तपिपासू दहशतवाद्यांना या क्षेत्रातील देशांच्या सत्तेवर बसविण्यासाठी इराणचे प्रयत्न सुरू आहेत’, असा आरोप इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला. इराणच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी या क्षेत्रातील देशांची स्वतंत्र संघटना उभारण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान बेनेट म्हणाले.

बाहरिनच्या ऐतिहासिक

त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलने या क्षेत्रातील देशांबरोबर लष्करी सहकार्य मजबूत केल्याची आठवण इस्रायली पंतप्रधानांनी करून दिली. तसेच इराणच्या धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायल हा मजबूत आणि विश्‍वासू सहकारी असल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी आश्‍वस्त केले. थेट उल्लेख केला नसला तरी इस्रायल आणि युएईमध्ये लष्करी सहकार्य प्रस्थापित होत असल्याचे संकेत पंतप्रधान बेनेट यांनी दिल्याचा दावा बाहरिनच्या दैनिकाने केला.

बाहरिनचे राजे हमाद आणि क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल-खलिफ यांची भेट घेण्याआधी इस्रायलच्या पंतप्रधानांनी बाहरिनमध्ये वास्तव्य असलेल्या ज्यूधर्मियांच्या नेत्यांशी चर्चा केली. तसेच इस्रायलच्या पंतप्रधानांनी बाहरिनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी नौदलाच्या कमांडच्या प्रमुखांचीही भेट घेतली.

इस्रायली पंतप्रधानांच्या या भेटीच्या काही तास आधीच इस्रायलने बाहरिनमध्ये आपला नौदल अधिकारी तैनात केला आहे. बाहरिनस्थित अमेरिकी नौदलाच्या कमांड सेंटरशी संपर्क व समन्वय साधण्यासाठी ही तैनाती असल्याचे इस्रायल व बाहरिनने स्पष्ट केले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info