सेऊल – ‘सध्याच्या जगात जिथे इतर देश अमेरिकेशी वाटाघाटी करण्यात आणि आंधळेपणाने शरण जाण्यात वेळ वाया घालवतात, तिथे या पृथ्वीवर उत्तर कोरिया असा एकमेव देश आहे, जो थेट अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला चढवून जगाला हादरवून सोडू शकतो’, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली. यासाठी अमेरिकेपर्यंत मारा करणार्या क्षेपणास्त्रांबरोबरच हायड्रोजन बॉम्ब, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे देखील आपल्याकडे असल्याचा दावा उत्तर कोरिया करीत आहे.
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी आपल्या शस्त्रसज्जतेची माहिती उघड केली. ‘जगात २०० हून अधिक देश आहेत. पण फक्त काही देशांकडेच हायड्रोजन बॉम्ब, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत’, असे सांगून उत्तर कोरियाने आपल्याकडे आधुनिक काळातील भीषण शस्त्रसाठा असल्याचा दावा केला. त्याचबरोबर गेल्या महिन्याभरात उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या उल्लेखनीय ठरतात. पण आपल्या देशाला अधिक युद्धसज्ज बनायचे आहे, असे उत्तर कोरियन परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले.
यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली. ‘उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेसाठी धोकादायक आहे’, असा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला. तसेच उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकाचा उल्लंघन करणारा देश असल्याचा आरोपही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाची लष्करी आक्रमकता रोखण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपल्या सहकारी देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे लष्कर सज्ज असल्याचा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.
जानेवारी महिन्यापासून उत्तर कोरियाने सात फेर्यांमध्ये निरनिराळ्या टप्प्यांच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. यामध्ये लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून बॅलेस्टिक तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा देखील समावेश असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. त्याचबरोबर पाणबुडीतून मारा करू शकणार्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे उत्तर कोरियन राजवटीने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. यातील काही क्षेपणास्त्रे जपानच्या सागरी क्षेत्राजवळ कोसळली होती. तर ‘हॅसॉंग-१२’ क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणानंतर अमेरिकेने आपल्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द केली होती. उत्तर कोरियाने २०१७ सालानंतर पहिल्यांदाच प्रक्षेपित केलेल्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात प्रशांत महासागर क्षेत्रातील अमेरिकेचे गुआम बेट येते. त्यामुळे या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, उत्तर कोरियाकडून सुरू असलेला अणुकार्यक्रम व क्षेपणास्त्र चाचण्या यासाठी सायबरहल्ले तसेच क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारा निधी वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियातील हॅकर्स सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून लष्करी ‘सिक्रेट्स’ चोरून त्यांची विक्री करीत असल्याचा आरोप होत आहे. पण अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंध लादू नये, अशी मागणी उत्तर कोरियाचा पाठिराखा असलेल्या चीनने केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |