‘डीआर काँगो’मध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भयंकर हत्याकांडात 60 जणांचा बळी

‘डीआर काँगो’मध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भयंकर हत्याकांडात 60 जणांचा बळी

किन्शासा – आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण हत्याकांडात 60 जणांचा बळी गेला आहे. युगाडांच्या सीमेनजिक असणार्‍या इतुरी प्रांतातील दोन गावांमध्ये हे हत्याकांड झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. ‘आयएस’ संलग्न ‘एडीएफ’ या दहशतवादी संघटनेने गेल्या 10 दिवसात घडविलेले हे दुसरे हत्याकांड ठरले आहे. यापूर्वी बेनी शहरानजिक घडविलेल्या हत्याकांडात 33 जणांचा बळी गेला होता.

हत्याकांडात

संयुक्त राष्ट्रसंघटनेेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून हत्याकांडाची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री ‘एडीएफ’च्या दहशतवाद्यांनी ‘शाबी’ व ‘बोगा’ या गावांमध्ये एकापाठोपाठ एक असे हल्ले चढविले. शाबीमध्ये घडविलेल्या हत्याकांडात किमान 24 जणांचा बळी गेला आहे. तर बोगामध्ये विस्थापितांच्या छावणीत केलेल्या हल्ल्यात 36 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येेते. दोन्ही गावांमधील घरांची जाळपोळ करण्यात आली असून अनेकांचे अपहरण करण्यात आल्याचेही संयुक्त राष्ट्रसंघटनेेने स्पष्ट केले.

हत्याकांडात

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व काँगोमध्ये गेल्या चार वर्षात झालेले हे सर्वात भीषण हत्याकांड आहे. गेल्या दोन वर्षात ‘एडीएफ’ ही दहशतवादी संघटना तसेच इतर बंडखोर गटांनी ‘डीआर काँगो’ला मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी पहिल्या पाच महिन्यातच ‘डीआर काँगो’मध्ये जवळपास 80 हल्ल्याच्या घटना घडल्या असून त्यात सुमारे 600 जणांचा बळी गेला आहे.

‘एडीएफ’ व इतर गटांविरोधात स्थानिक लष्कर तसेच युगांडाने व्यापक मोहिमही राबविली होती. मात्र त्यानंतर दहशतवादी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून सुरक्षायंत्रणा हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इतुरी व किवु प्रांतात ‘मार्शल लॉ’देखील लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मोठे हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 10 दिवसात झालेल्या दोन मोठ्या हत्याकांडांनंतर ‘डीआर काँगो’ तसेच युगांडा पुन्हा संयुक्त मोहीम हाती घेतील, असे संकेतही देण्यात येत आहेत.

आफ्रिकेत सर्वाधिक खनिजसंपत्ती असणार्‍या देशांमध्ये ‘डीआर काँगो’चा समावेश होतो. नऊ कोटींहून अधिक लोकसंख्या असणार्‍या या देशात कोबाल्ट, हिरे, तांबे तसेच ‘कोल्टन’च्या मोठ्या खाणी आहेत. एका अहवालानुसार, या देशात सुमारे 24 ट्रिलियन डॉलर्स इतकी प्रचंड खनिजसंपत्ती आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info