मॉस्को/किव्ह – रशिया-युक्रेन सीमाभाग तसेच क्रिमिआमधून काही लष्करी तुकड्या माघारी परतत असल्याचे फोटोग्राफ्स रशियन यंत्रणांनी प्रसिद्ध केले आहेत. हे फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत असतानाच युक्रेनचा संरक्षण विभाग तसेच आघाडीच्या बँकांवर सायबरहल्ले झाले आहेत. पण या हल्ल्यासाठी रशियावर आरो करण्याचे युक्रेनने टाळले आहे. त्यामुळे निदान या मुद्यावर नवा तणाव निर्माण झालेला नाही.
बुधवारी १६ फेब्रुवारीला रशिया युक्रेनवर आक्रमण करेल, असे आक्रमक दावे पाश्चात्य यंत्रणा व प्रसारमाध्यमांकडून करण्यात आले होते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही आपल्याला तशी माहिती मिळाल्याचे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात या कथित आक्रमणाच्या एक दिवस अगोदरच रशियाने आपल्या काही लष्करी तुकड्या मागे घेण्यास सुरुवात केली. क्रिमिआ तसेच रशिया-युक्रेन सीमाभागात आयोजित करण्यात आलेल्या युद्धसरावाचा टप्पा संपल्याने लष्करी तुकड्या माघारी जात असल्याचे रशियाने स्पष्ट केले. या माघारीचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
रशियाची ही माघारी सुरू असतानाचा मंगळवारी युक्रेनचा संरक्षण विभाग तसेच बँकांच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सवर सायबरहल्ले झाले. हे हल्ले ‘डीडीओएस’ प्रकारातील होते व त्यामुळे संरक्षण विभागासह बँकांच्या वेबसाईट्स काही काळ ‘हँग’ झाल्या होत्या अशी माहिती युक्रेनकडून देण्यात आली. हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे आता नक्की सांगता येणार नाही असे युक्रेनच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. यापूर्वी रशियन हॅकर्सकडून युक्रेनवर मोठे सायबरहल्ले चढविण्यात आले होते. त्यामुळे यामागे रशियाचा हात असण्याची शक्यता नाकारात येत नाही.
यापूर्वी १२ जानेवारीला युक्रेनवर मोठा सायबरहल्ला चढविण्यात आला होता. त्यात युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयासह विविध दूतावासांच्या वेबसाईट्स, सिक्युरिटी ऍण्ड डिफेन्स काऊन्सिल तसेच शिक्षण विभाग व आपत्कालिन विभागाच्या वेबसाईट्सना लक्ष्य करण्यात आले होते. यातील काही वेबसाईट्सवर रशियन व पोलिश भाषेत संदेश झळकले होते. त्यात वेबसाईट्सवर असलेली युक्रेनच्या नागरिकांची माहिती मिळविण्यात आल्याचे व ती प्रसिद्ध करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
असे असूनही यावेळी युक्रेनने सायबर हल्ल्यांसाठी अद्याप रशियावर आरोप केलेला नाही, ही लक्षवेधी बाब ठरते. दरम्यान, ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय ६’चे माजी प्रमुख जॉन सॉअर्स यांनी, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा धोका काही राष्ट्रांनी उभ्या केलेल्या देखाव्याइतका गंभीर कधीच नव्हता, असे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रमानंतर रशियाला काही प्रमाणात लाभ झाल्याचे दिसत आहे, असा दावाही ब्रिटनच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी केला.
रशियन माघारीचे ठोस पुरावे नसल्याचा नाटोचा दावा
ब्रुसेल्स – रशियाने लष्करी माघारीचे दावे केले असले तरी त्याचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत व अजूनही युरोपच्या सुरक्षेला असलेला धोका कायम आहे, असा दावा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. बुधवारी ब्रुसेल्समध्ये नाटोची दोन दिवसांची बैठक सुरू झाली असून यासाठी सदस्य देशांचे संरक्षणमंत्री ब्रुसेल्समध्ये दाखल झाले आहेत. अमेरिका तसेच युक्रेननेही रशियाच्या माघारीच्या दाव्यांवर सावधगिरीची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने अद्याप रशियन दाव्यांची पुष्टी केलेली नाही, असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले.
दरम्यान, रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटोने पूर्व युरोपात प्रत्येकी हजार जवानांचा समावेश असलेले चार बॅटलग्रुप्स तैनात करण्याचे संकेत दिले आहेत. नाटोच्या या प्रस्तावावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |