शत्रूच्या आक्रमणाआधीच हवाई हल्ले चढविण्याचे जपानचे संरक्षण धोरण

- जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी

नोबुओ किशी

टोकिओ/बीजिंग – शत्रूदेशाचा हल्ला होण्यापूर्वी त्या देशाच्या भूमीवर केलेले हवाई हल्ले हा जपानच्या संरक्षणधोरणाचाच भाग असल्याची ग्वाही जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी दिली. बुधवारी संसदेत झालेल्या सुनावणीदरम्यान संरक्षणमंत्री किशी यांनी ही माहिती दिली. गेल्या काही वर्षात चीन व उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर जपानने आपल्या संरक्षण धोरणात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. संरक्षणमंत्री किशी यांनी संसदेत दिलेली ग्वाही त्याचाच भाग ठरतो.

‘जपानवर क्षेपणास्त्रहल्ला होण्याची शक्यता असेल तर शत्रूच्या हवाईहद्दीत लढाऊ विमाने पाठवून नियोजित लक्ष्यावर हल्ले चढविले जाऊ शकतात. ही बाब जपानच्या स्वसंरक्षणाचाच भाग ठरते व तो देशाच्या संरक्षण धोरणाचाच हिस्सा आहे’, असे जपानचे संरक्षणमंत्री किशी यांनी संसदेत स्पष्ट केले. त्याचवेळी दुसर्‍या देशावर हल्ला करण्याची क्षमता असणारे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र जपान आपल्या संरक्षणदलात सामील करणार नाही, असेही जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

नोबुओ किशी

जपानचे कॅबिनेट सचिव हिरोकाझु मात्सुनो यांनीही किशी यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. ‘राज्यघटनेने दिलेले अधिकारांच्या आवाक्यानुसार व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विचार करता जपान उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करेल’, असे मात्सुनो यांनी स्पष्ट केले. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी यापूर्वीच जपान शत्रूदेशाविरोधात सर्व पर्यायांचा वापर करु शकतो, असे जाहीर केले होते. यात शत्रूच्या तळावर हल्ला चढविण्यासाठी योग्य क्षमता मिळविण्याचाही समावेश असेल, असेही पंतप्रधान किशिदा म्हणाले होते.

जपानच्या राज्यघटनेनुसार, देशातील संरक्षणदलांना फक्त बचावासाठी हल्ले करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र या धोरणात गेल्या दशकापासून बदल होण्यास सुरुवात झाली. जपानचे माजी पंतप्रधान ऍबे यांनी देशाच्या संरक्षणधोरणात आक्रमक स्वरुपाचे बदल सुचविले होते. त्यानुसार पावले उचलण्यात येत असून गेली काही वर्षे जपान सातत्याने संरक्षणखर्चात वाढ करीत आहे. गेल्या महिन्यात जपानने संरक्षण धोरणाचा भाग असणार्‍या ‘नॅशनल डिफेन्स प्रोग्राम गाईडलाईन्स’ व ‘मिडियम टर्म डिफेन्स प्रोग्राम’मध्येही बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नोबुओ किशी

गेल्या काही वर्षात चीन तसेच उत्तर कोरियाकडून आक्रमक हालचाली सुरू आहेत. चीन जपाननजिकच्या सागरी हद्दीत सातत्याने युद्धनौका तसेच गस्तीनौका धाडत असून गेल्या वर्षी एका पाणबुडीचाही वावर आढळला होता. चीनने रशियन युद्धनौकांच्या सहाय्याने जपानच्या सागरी हद्दीजवळ गस्ती मोहिमही राबविली होती. दुसर्‍या बाजूला उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रक्षमता वाढविण्याच्या हालचाली सुरू असून गेल्या काही महिन्यात नव्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत.

यामुळे जपानच्या सुरक्षेला असणारा धोका वाढला असून जपान अधिक आक्रमक व आग्रही भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. संरक्षणमंत्री किशी यांनी संसदेत दिलेली ग्वाही त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info