किव्ह/मॉस्को – तिसरे महायुद्ध भडकले तर त्यात अण्वस्त्रांचा वापर होईल आणि हे युद्ध अतिभयंकर संहार घडविणारे ठरेल, असा थरकाप उडविणारा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. रशियाने आपल्या नौदलाच्या आण्विक पाणबुडीचा सहभाग असलेला युद्धसराव सुरू करून हा इशारा पोकळ नसल्याचे दाखवून दिले. इतकेच नाही तर युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा करणार्या अमेरिका व नाटोवर हल्ले होऊ शकतात, असे रशियाने बजावले आहे. त्याचवेळी अमेरिका व इतर देशांनी लादलेल्या कठोर निर्बंधांना प्रत्युत्तर देणारे निर्बंध रशियानेही लादले आहेत.
युक्रेनची राजधानी किव्हला घेरलेे असतानाच, रशियाने युक्रेनच्या खारकिव्ह शहरावरील हल्ले तीव्र केले. रशियन सैन्याचे पॅराट्रूपर्स खारकिव्हमध्ये उतरले आहेत. येत्या काही तासात रशिया खारकिव्हचा ताबा घेऊन युक्रेनचा प्रतिकार मोडून काढू शकतो, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचवेळी अमेरिका व नाटोने युक्रेनच्या लष्कर तसेच जनतेलाही शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केली आहे. अमेरिका नाटोच्या सदस्यदेशांनी अशारितीने युक्रेनचा संघर्ष तीव्र केला तर त्याचे पडसाद उमटतील, असे रशियाने बजावले आहे. अमेरिका-नाटोकडून पुरविल्या जाणार्या या शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर घणाघाती हल्ले होतील, असे इशारे रशिया देत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच नाटोचे सदस्य देश देखील युक्रेनच्या प्रश्नावर रशिया एकाकी पडला असून याआधी रशियासमोर असे आव्हान उभे राहिलेले नव्हते, असा दावा करीत आहेत. मात्र रशियाला बरेच मित्र आहेत, रशिया एकाकी पडू शकत नाही, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी ठासून सांगितले. युक्रेनचे युद्ध अधिक पेटविले तर तिसर्या महायुद्धाचा भडका उडेल, असा इशारा लॅव्हरोव्ह यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिला. तिसर्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर होईल आणि ही बाब अतिभयंकर संहार घडविणारी ठरेल, असे सांगून अमेरिका तसेच अमेरिकेच्या सहकारी देशांनी कुठल्याही भ्रमात राहता कामा नये, असा संदेश लॅव्हरोव्ह यांनी दिला आहे.
युक्रेन अण्वस्त्रे मिळविण्यासाठी प्रयत्न की आहे. शिवाय सोव्हिएत रशियाच्या काळातील अणुतंत्रज्ञान युक्रेनकडे आहे. रशियाला यापासून फार मोठा धोका संभवतो, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेने युरोपिय देशांमधील आपली अण्वस्त्रे मागे घ्यावी, असे आवाहन केले होते. तर रशियाचे उपरराष्ट्रमंत्री अलेक्झँडर ग्रुश्को यांनी आपल्या देशाचा नाटोबरोबर थेट संघर्ष भडकू शकतो, असे बजावले आहे. हा संघर्ष टाळायचा असेल तर नाटोने भानावर यावे, असा इशारा उपरराष्ट्रमंत्री ग्रुश्को यांनी दिला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |