मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील युद्धात रशियाला अडकवून युक्रेनचा अफगाणिस्तानसारखा वापर करण्याचा अमेरिकेचा डाव होता. पण रशियाने युक्रेनचे युद्ध संपविण्याच्या दिशेने जबरदस्त पावले उचलली आहेत. युक्रेनमधील युद्धाचे अणुयुद्धात रुपांतर होईल, याची आणखी एकदा जाणीव रशियाने अमेरिका-नाटोला करून दिली. शुक्रवारी युक्रेनच्या झापोरिझझिया अणुप्रकल्पावर हल्ला चढवून रशियाने याचा ताबा घेतला. यामुळे युरोप मृत्यूपंथाला लागला आहे, असा दावा करून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपिय देशांना युद्धात उतरण्याचे आवाहन केले. पण अमेरिकेसह नाटोने आपल्या सदस्यांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली जाईल, असे सांगून या युद्धात उतरण्याची शक्यता नाकारली आहे.
रशियाने युक्रेनची बंदरे व दहा प्रमुख शहरांवर भीषण हल्ल्यांची मालिका सुरू केली. यामुळे युक्रेनची जबर हानी झाली असून युक्रेनच्या तथाकथित लष्करी प्रतिकाराचे दावे मोडीत निघाले आहेत. इतकेच नाही तर रशियाने युक्रेनमध्ये असलेला युरोपमधील सर्वात मोठा झापोरिझझिया अणुप्रकल्प आपल्या ताब्यात घेतला. या अणुप्रकल्पातील पाच मजली प्रशिक्षण तळावर आग पेटल्याचे समोर आले होते. पण याबाबत युक्रेन आणि रशिया परस्परांवर आरोप करीत आहेत.
रशियन लष्कराच्या हल्ल्यामुळे ही आग पेटली असे युक्रेनचे म्हणणे आहे. यामुळे आण्विक दुर्घटना घडू शकली असती, अशी भीती युक्रेनने व्यक्त केली. तर रशियाने या आगीसाठी युक्रेनलाच जबाबदार धरले. ही भयंकर चिथावणी होती, असे रशियाचे म्हणणे आहे. याआधी रशियाने युक्रेनच्या चेर्नोबिल अणुप्रकल्पाचा ताबा घेतलेला आहे. याद्वारे रशिया युक्रेनचा आण्विक पातळीवरील प्रतिकार मोडून काढत असल्याचे दावे केले जातात. सोव्हिएत रशियाच्या काळात युक्रेनमध्ये असलेले अणुतंत्रज्ञान व साहित्य अणुहल्ला चढविल्यासाठी वापरले जाऊ शकते, असे रशियाचे म्हणणे आहे. त्यासाठी युक्रेनची ही क्षमता संपुष्टात आणण्यासाठी सदर अणुप्रकल्प ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचे रशिया सांगत आहे.
दरम्यान, युक्रेनमधील लष्करी कारवाई ठरल्यानुसार होत असून नियोजित उद्दिष्टे देखील वेळेनुसार गाठली जात आहेत, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी युक्रेन ताब्यात घेण्या अपयश आलेल्या रशियन लष्करावर राष्ट्राध्यक्ष पुतिन नाराज असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र त्यात तथ्य नसल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या या उद्गारातून स्पष्ट केले.
रशियाच्या विरोधात गर्जना करणार्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडमध्ये पळ काढल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली होती. पण ते युक्रेनमध्येच आहेत, असे सांगून युक्रेनच्या सरकारने हे दावे खोडून काढले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाने झापोरिझझिया अणुप्रकल्प ताब्यात घेऊन युरोपला मृत्यूपंथाला लावल्याचा ठपका ठेवला आहे. निदान आत्ता तरी जागे व्हा आणि रशियापासून असलेला धोका ओळखा, असे झेलेन्स्की यांनी बजावले आहे. मात्र युरोपिय देश, नाटो आणि अमेरिका देखील युक्रेनच्या या युद्धात थेट सहभागी होण्यास तयार नाहीत. अमेरिकेने पोलंड तसेच युक्रेनच्या इतर शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तैनाती करण्याची घोषणा केली. युक्रेनची कितीही वाताहत झाली तरी अमेरिका व नाटो रशियाबरोबर थेट लष्करी टक्कर घेण्यास तयार नसल्याचे यामुळे आणखी एकवार समोर आले आहे.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |