युक्रेनमध्ये ‘नो फ्लाय झोन’ लागू करणार्‍यांना युद्धातील सहभागी ठरविले जाईल

- रशियन राष्ट्राध्यक्षांचा इशारा

‘नो फ्लाय झोन’

मॉस्को – कुणा तिसर्‍या पक्षाने युक्रेनमध्ये ‘नो फ्लाय झोन’ लागू केला, तर तो युक्रेनमधील युद्धातील सहभाग मानला जाईल, असा आणखी एक सज्जड इशारा रशियाने दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी हा इशारा देऊन, नो फ्लाय झोन लागू करणारा देश कुठल्याही संघटनेचा सदस्य असला तरी त्याची पर्वा केली जाणार नाही, असे बजावले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका व नाटोकडे सदर मागणी करून ती नाकारल्याबद्दल अमेरिका तसेच नाटोवरही टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन हवाई दलाचे जबरदस्त हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील शहरांची पडझड झाली असून त्याचे भयंकर परिणाम या देशाला सहन करावे लागत आहेत. काही वेळेस युक्रेनचे लष्कर व हवाई दल रशियन विमाने आणि हेलिकॉप्टर्सना पाडल्याचे दावे करीत आहेत. पण त्याचा रशियाच्या हवाई हल्ल्यांवर परिणाम झालेला नाही. मात्र रशियाने युक्रेनमधील दोन शहरांमध्ये संघर्षबंदी जाहीर केली. तरीही इथे हल्ले होत असल्याचे आरोप युक्रेनकडून केले जात आहेत.

‘नो फ्लाय झोन’

अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका व नाटोला युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करण्याचे आवाहन केले. तसे झाल्यास युक्रेनच्या हवाई हद्दीत उड्डाण करणारे प्रत्येक विमान पाडण्याची संधी अमेरिका व नाटोला मिळेल. मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही मागणी मान्य करून रशियाबरोबर युद्ध पुकारण्यास अमेरिका व नाटो तयार नाही. त्यांनी ही मागणी धुडकावली असून त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका तसेच युरोपिय देशांवरही टीका केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सज्जड इशारा देऊन नो फ्लाय झोनची घोषणा करणारा पक्ष या युद्धात सहभागी झाल्याने मानले जाईल, असे बजावले आहे. ही घोषणा एखाद्या देशाने केली तर त्या देशावर रशिया कारवाई करील, मग तो कुठल्याही संघटनेचा सदस्य असला तरी त्याची पर्वा केली जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले आहे. रशियाकडून देण्यात आलेला हा इशारा नो फ्लाय झोनची शक्यताच निकालात काढणारा ठरतो. यामुळे युक्रेन रशियाबरोबरील युद्धात एकाकी पडल्याचे आणखी एकवार स्पष्ट झाले आहे.

English     हिंदी   

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info