इंधनाच्या आयातीवरील बंदी रशियन अर्थव्यवस्थेला हादरा देणारी ठरेल

- अमेरिकेचा दावा

इंधनाच्या आयातीवरील बंदी

वॉशिंग्टम/लंडन/मॉस्को – रशियातून येणार्‍या इंधनाच्या आयातीवर बंदी टाकल्याने, अमेरिकेतील इंधनाचे दर वाढतील. त्याचा भार अमेरिकन जनतेला सहन करावा लागेल. पण त्याला नाईलाज आहे, लोकशाहीसाठी आपल्याला ही किंमत मोजावीच लागेल, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियन इंधनाच्या आयातीवर बंदीची घोषणा केली. यामुळे रशियन अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडेल, असा दावा बायडेन यांनी केला. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, रशियन इंधनावरील बंदी आधी टाकलेल्या कठोर निर्बंधांशी सुसंगत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिका व ब्रिटनने टाकलेल्या निर्बंधांचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटले असून कच्च्या तेलाचे दर १३२ डॉलर्स प्रति बॅरलवर गेले आहेत. तर युरोपातील नैसर्गिक इंधनवायुचे दर प्रति मेगावॅट/अवरमागे २०० युरोच्या वर भडकले आहेत. पुढील काळात कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायुचे दर विक्रमी पातळीवर जाऊ शकतात, असा इशारा इंधनक्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांनी दिला आहे.

इंधनाच्या आयातीवरील बंदी

रशिया-युक्रेन युद्धाला १४ दिवस उलटले असून रशियाने माघार घ्यावी यासाठी पाश्‍चिमात्य देश जंगजंग पछाडत आहेत. युद्धाला सुरुवात झाल्यापासून अमेरिका व नाटोसह मित्रदेशांकडून रशियावर सातत्याने निर्बंधांचा मारा होत आहे. रशियाच्या वित्त, बँकिंग, संरक्षण, गुंतवणूक, अंतराळ, तंत्रज्ञान यासह बहुतांश क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र यातून इंधनक्षेत्राला वगळण्यात आले होते. मंगळवारी अमेरिका व ब्रिटनने केलेली घोषणा आता रशियाचे इंधनक्षेत्रही निर्बंधांच्या कचाट्यात आल्याचे दाखवून देते.

रशिया हा इंधनक्षेत्रातील आघाडीचा उत्पादक देश आहे. अमेरिकेकडून होणार्‍या कच्चे तेल व रिफायनरी उत्पादनांच्या आयातीपैकी आठ टक्के आयात रशियाकडून करण्यात येते. तर ब्रिटनकडून होणार्‍या इंधनआयातीपैकी सहा टक्के इंधन रशियातून आयात होते. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.

‘अमेरिकेने तेल, वायू व ऊर्जा क्षेत्रातील रशियन आयातीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या कोणत्याही बंदरावर यापुढे रशियन इंधन स्वीकारले जाणार नाही. हा अमेरिकी जनतेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिलेला जबरदस्त दणका आहे’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आयातीवरील बंदी जाहीर केली. बायडेन यांच्या या घोषणेचे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात स्वागत झाले असले तरी नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिकेतील इंधनाचे दर प्रति गॅलन ४.१७ डॉलर्सपर्यंत उसळले आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वाधिक दर ठरले आहेत.

इंधनाच्या आयातीवरील बंदी

अमेरिकेबरोबरच ब्रिटननेही रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी जाहीर केली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ब्रिटन रशियाची इंधन आयात पूर्णपणे थांबवेल, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. ब्रिटनने घेतलेल्या या निर्णयानंतर काही तासातच रशियन इंधनाचे सात टँकर्स ब्रिटनच्या बंदरांमधून माघारी पाठविण्यात आल्याचे वृत्त ब्रिटीश माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअरबॉक यांनी पुन्हा एकदा रशियन इंधनाची आयात सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

‘जर्मनीला लागणार्‍या इंधनापैकी एक तृतियांश इंधन रशियातून आयात होते. जर आयात थांबविण्याचा निर्णय घेतला तर उद्यापासून जर्मनी पुढे सरकूही शकणार नाही’, अशा थेट शब्दात जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info