युक्रेनच्या युद्धाला महिना होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युरोपच्या भेटीवर

किव्ह/ब्रुसेल्स – युक्रेनमधील युद्धाला महिना होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन युरोपिय देशांच्या भेटीवर आले आहेत. बेल्जियमच्या ब्रुसेल्समध्ये नाटोच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भाग घेतला. यावेळी पूर्व युरोपातील तैनाती अधिक प्रमाणात वाढविण्याचा आक्रमक निर्णय नाटोने जाहीर केला आहे. तसेच युक्रेनला रशियाविरोधी युद्धात सर्वतोपरी सहाय्य पुरविण्यावरही नाटोच्या या बैठकीत सहमती झाल्याचा दावा करण्यात येतो. नाटोच्या बैठकीनंतर, जी७ व युरोपिय महासंघाच्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील. युक्रेनचे युद्ध हाच या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

युक्रेनची राजधानी किव्हसह इतर काही प्रमुख शहरांची रशियन सैन्याने नाकेबंदी केली आहे. मात्र राजधानी किव्हच्या सुमारे २५ किलोमीटर अंतरावर थांबलेले रशियन सैन्य किव्हमध्ये घुसलेले नाही. त्याऐवजी किव्हची कोंडी करण्याचा निर्णय रशियन सैन्याने घेतला आहे. तर दुसर्‍या बाजूला युक्रेनच्या इतर शहरांवर रशियाचे घणाघाती हल्ले अजूनही सुरू आहेत. गुरूवारी युक्रेनने बर्डियान्स बंदरावर असलेल्या रशियन विनाशिकेवर हल्ला चढविला. यामुळे या विनाशिकेवर आग भडकली होती. युक्रेनचे लष्कर अशारितीने रशियाला टक्कर देत असल्याचे सांगून नाटोने या युद्धात रशियाचे सात ते १५ हजार सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. मात्र युक्रेनचे या युद्धात किती नुकसान झाले, याची माहिती नाटोने दिलेली नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

दरम्यान, रशियाने आपल्या देशातील अमेरिकेच्या १२ राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. युक्रेनवर रशियाने चढविलेल्या हल्ल्याविरोधात जगभरात प्रचारमोहीम छेडणार्‍या अमेरिकेला रशियन राजदूतांनी आरसा दाखविला आहे. अमेरिकेचे रशियातील राजदूत अँटोनोव्ह यांनी अमेरिका व नाटोने युगोस्लाव्हिया, इराक आणि लिबिया या देशांवर किती भयंकर हल्ले चढविले होते, ते अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय विसरले आहे का? असा सवाल अँटोनोव्ह यांनी केला. याबरोबरच अफगाणिस्तान आणि सिरियामधील जनतेवर अमेरिकन जवान आणि कंत्राटी सैनिकांनी किती अत्याचार केले, याचाही विसर वॉशिंग्टनला पडलेला आहे का? असे प्रश्‍न रशियन राजदूतांनी केले. युक्रेनच्या युद्धाचा दाखला देऊन रशियन राष्ट्राध्यक्ष युद्धगुन्हेगार असल्याचा ठपका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला होता. त्यावर रशियाची ही जळजळीत प्रतिक्रिया आली आहे.

दरम्यान, नाटोच्या बैठकीला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोकडे हवाई सुरक्षा तसेच युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांची मागणी केली. थेट ही मागणी मान्य न करता, अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केली आहे. पूर्व युरोपमधील स्लोव्हाकिया, रोमानिया, बल्गेरिया आणि हंगेरी या चारही देशांमधील तैनाती वाढविण्याचा आक्रमक निर्णय नाटोने घेतला आहे. याद्वारे रशियावरील दडपण अधिकच वाढविण्याची तयारी नाटोने केली आहे. मात्र यामुळे रशियाच्या लष्करी हालचाली अधिकच तीव्र होणार असून रशियाने पोलंड तसेच युक्रेनच्या इतर शेजारी देशांना दिलेले सज्जड इशारे याचीच साक्ष देत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info