मॉस्को/लिव्ह/वॉर्सा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंडमध्ये दाखल होण्यापूर्वी, रशियाचा सहकारी देश असलेल्या बेलारूसने पाश्चिमात्यांना खणखणीत इशारा दिला. पोलंडने युक्रेनमध्ये शांतीसैनिक पाठविण्याचा दिलेल्या प्रस्तावाचा अर्थ ‘तिसरे महायुद्ध’ असा होतो, असे बेलारूसने बजावले आहे. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी पाश्चिमात्यांनी रशियावर ‘हायब्रिड वॉर’ लादल्याची घोषणा केली. रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करून रशियाला उद्ध्वस्त करण्याचा पाश्चिमात्यांचा डाव असल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी ठेवला आहे.
युक्रेनमधील युद्धाला महिना उलटला असून हे युद्ध अधिकाधिक उग्ररूप धारण करू लागले आहे. रशियाने आपली अतिप्रगत इस्कंदर क्षेपणास्त्रे तैनात ठेवून या युद्धाची भीषणता अधिकच वाढविण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी युक्रेनच्या शहरांवर रशियन क्षेपणास्त्रे व तोफांचा जबरदस्त मारा सुरू आहे. मात्र या शहरांचा ताबा घेण्यासाठी रशियन सैन्याने पुढाकार घेतलेला नाही. या शहरांमध्ये युक्रेनी लष्कराच्या जवानांबरोबर कंत्राटी सैनिक असल्याचा दावा केला जातो. एकदा का रशियन सैनिक या शहरांमध्ये घुसले की त्यांच्यावर हल्ले चढविण्याची योजना युक्रेनी लष्कराने आखलेली आहे. यामुळे हवाई हल्ल्यांद्वारे युक्रेनी लष्कर तसेच कंत्राटी जवानांना संपविणारे घणाघाती हवाई हल्ले रशियन लष्कराकडून चढविण्यात येत आहेत.
युक्रेनमधील या युद्धाची तीव्रता वाढलेली असतानाच, नाटो-युरोपिय महासंघ व जी७ची बैठक संपवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंडमध्ये दाखल झाले. पोलंडच्या सीमेजवळील युक्रेनच्या भागात रशियाचे हवाई हल्ले सुरू असतानाच, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा हा पोलंड दौरा ही संवेदनशील बाब ठरते आहे. रशियाने युक्रेनमध्ये रासायनिक हल्ले चढविलेच, तर त्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पोलंडच्या दौर्यापूर्वी दिला होता. यावर रशियाचा सहकारी देश असलेल्या बेलारूसने प्रतिक्रिया नोंदविली होती. पोलंडने युक्रेनमध्ये शांतीसैनिक धाडण्याचा प्रस्ताव दिला. काही युरोपि देश यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहितीही समोर आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झँडर लुकाशेन्को यांनी पोलंडचा हा प्रस्ताव म्हणजे तिसरे महायुद्ध असल्याचे बजावले आहे.
‘पाश्चिमात्यांनी रशियाच्या विरोधात ‘हायब्रिड युद्ध’ पुकारले असून रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणारे कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाला उद्ध्वस्त करण्याचा पाश्चिमात्यांचा डाव आहे. त्यासाठी रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न पाश्चिमात्यांनी केला. पण रशिया एकाकी पडलेला नाही. रशियाचे मित्र व सहकारी देश जगभरात आहेत. म्हणूनच पाश्चिमात्यांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतरही अनेक देशांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिलेला आहे’, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह म्हणाले. युरोपिय देश देखील अमेरिका व नाटोच्या रशियाविरोधी भूमिकेशी सहमत नसल्याचे दिसत आहे. हंगेरीने युक्रेनला शस्त्रे पुरविण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |