मॉस्को – आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी जागतिक आर्थिक व्यवस्था आकार घेत आहे. पण त्यात पाश्चिमात्य देशांना विशेष स्थान नसेल, असा दावा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी केला आहे. निर्बंध लादून रशियन अर्थव्यवस्थेला पांगळे करण्याचा अमेरिका व पाश्चिमात्य देशांचा डाव त्यांच्यावरच बूमरँग झाला आहे, असा इशाराही मेदवेदेव्ह यांनी दिला. दरम्यान, रशियन इंधनाबरोबरच अन्नधान्य, धातू व इतर महत्त्वाच्या उत्पादनांच्या निर्यातीचे व्यवहारही रुबल चलनातच करण्याचे संकेत रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाला एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला असून अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर सातत्याने कठोर निर्बंधांचा मारा चालविला आहे. रशियन अर्थव्यवस्थेचा आधार मानल्या जाणार्या इंधनक्षेत्रापासून वित्त, बँकिंग, संरक्षण, गुंतवणूक, अंतराळ, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांना या निर्बंधांद्वारे लक्ष्य करण्यात आले. रशियाने माघार घ्यावी यासाठी निर्बंधांचा हत्यारासारखा वापर करण्यात येत आहे. रशियन अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होत असले तरी रशियाने माघार घेतलेली नाही. उलट अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इतर पर्यायांचा वापर सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर, रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष असणार्या दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी पाश्चिमात्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या परकीय गंगाजळीवर निर्बंध टाकून अमेरिका व युरोपिय महासंघाने त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. जे देश इतर देशांची खाती गोठवितात, व्यावसायिक व खाजगी मालमत्ता चोरतात आणि खाजगी मालमत्तांबाबतच्या मुलभूत सिद्धांताची मोडतोड करतात, अशांवर यापुढे विश्वास ठेवणे शक्य नाही’, या शब्दात मेदवेदेव्ह यांनी पाश्चिमात्य देशांची खरडपट्टी काढली.
‘पाश्चिमात्य देशांचे रशियाला रोखण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारांमध्ये नवी तत्त्वे राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या अस्तित्त्वात असलेल्या अर्थविषयक जागतिक व्यवस्थेत बदल घडविण्याची प्रक्रिया सुरू होत आहे’, अशा शब्दात मेदवेदेव्ह यांनी नव्या जागतिक आर्थिक व्यवस्थेचे संकेत दिले. ‘राखीव चलनांवर असलेला विश्वास धुक्याप्रमाणे विरळ होत चालला आहे. डॉलर व युरोचा वापर बंद करण्याची कल्पना आता तितकीशी अवास्तव राहिलेली नाही आणि स्थानिक चलनांचा वापराचे पर्व सुरू होत आहे’, असा संदेश रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी जगाला दिला आहे.
रशिया सरकारने आपले स्थानिक चलन रुबलचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी याची माहिती दिली. पाश्चिमात्यांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादण्याचे प्रयत्न केल्यावर यापुढील इंधनव्यवहार रुबलमध्ये करण्यात येतील, असे प्रत्युत्तर रशियाने दिले होते. आता केवळ इंधनच नाही तर अन्नधान्ये व कच्चा माल म्हणून निर्यात होणार्या घटकांची किंमतही रुबलमध्येच निश्चित केली जाईल, असे पेस्कोव्ह यांनी सांगितले. चीन व भारत यासारख्या आघाडीच्या देशांना रशियाने यासंदर्भात प्रस्ताव दिल्याचेही समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |