जीनिव्हा – रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापाराच्या वाढीला मोठा फटका बसेल, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी दिला. यापूर्वी तयार केलेल्या अहवालात व्यापार ४.८ टक्क्यांनी वाढेल, असे भाकित करण्यात आले होते. पण रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामांमुळे ही वाढ अडीच टक्क्यांपर्यंत खाली घसरु शकते, असे जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख एन्गोझी ओकोन्जो-इवेला यांनी बजावले आहे. रशिया-युक्रेन युद्धाला एक महिना उलटला असून या काळात जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये महागाई भडकली आहे. या महागाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल, अशी भीती अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकांनी वर्तविली आहे.
रशिया व युक्रेन या देशांचा उल्लेख जगाचे ‘ब्रेडबास्केट’ असा करण्यात येतो. गहू, कडधान्य, मका, सूर्यफूल यांच्या उत्पादनात हे देश आघाडीवर आहेत. जागतिक कडधान्याच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १४ टक्के निर्यात रशिया व युक्रेनमधून केली जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांमधील शेतीवर मोठे परिणाम झाले आहेत. रशियावरील निर्बंधांमुळे या देशातून होणारी अन्नधान्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहेत. तर युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे या देशातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांनी रशियन निर्यातीवर टाकलेल्या निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून धातू व कच्च्या मालाची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘जागतिक व्यापारातील निर्यातीपैकी रशिया व युक्रेनचा वाटा एकूण अडीच टक्के इतका आहे. मात्र काही क्षेत्रांमध्ये हे दोन्ही देश आघाडीचे उत्पादक तसेच निर्यातदार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात उद्भवलेल्या संकटाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार आहेत. युक्रेनमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबल्याने अनेक अविकसित व गरीब देशांना मोठा फटका बसू शकतो. या देशांमध्ये महागाई कडाडू शकते’, असा इशारा व्यापार संघटनेच्या प्रमुख एन्गोझी ओकोन्जो-इवेला यांनी दिला. अन्नधान्याची टंचाई व त्यातून उपासमारीचे संकट तीव्र होऊ शकते, याकडे एन्गोझी ओकोन्जो-इवेला यांनी लक्ष वेधले.
आफ्रिकी देशांमध्ये याचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली आहे. आफ्रिकेतील ३५ देश रशिया व युक्रेनमधून अन्नधान्य आयात करतात. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात आफ्रिकी देशांमधील अन्नधान्याच्या किंमती २० ते ५० टक्क्यांनी भडकल्या आहेत. गेल्याच महिन्यात, रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याच्या दरांमध्ये २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून आशिया, आफ्रिका व आखाती देशांमध्ये अन्नधान्याची गंभीर समस्या उद्भवू शकते, असे संयुक्त राष्ट्रसंघटनेने बजावले होते. तर आखाती, आफ्रिकी व आशियाई देशांमध्ये अन्नधान्यासाठी दंगली उसळू शकतात, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |