नाटो-युक्रेन नौदल सरावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून ब्लॅक सीमध्ये ‘बॉम्बिंग एक्सरसाईज’

मॉस्को – युक्रेनकडून अमेरिकेसह नाटोच्या 30 सदस्य देशांबरोबर सुरू असलेल्या नौदल सरावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाच्या लढाऊ विमानांनी ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात ‘बॉम्बिंग एक्सरसाईज’ केल्याचे समोर आले आहे. रशियाच्या या मोहिमेनेे नाटो व युक्रेनच्या सरावात कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे. मात्र गेल्या महिन्यात ब्रिटीश युद्धनौकेविरोधात रशियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचा ‘बॉम्बिंग एक्सरसाईज’ लक्ष वेधून घेणारा ठरतो, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

bombing exercise, बॉम्बिंग एक्सरसाईज bombing exercise, बॉम्बिंग एक्सरसाईज

जून महिन्याच्या अखेरीस युक्रेन व नाटोच्या 30 सदस्य देशांमध्ये ‘सी ब्रीझ2021’ हा नौदल सराव सुरू झाला आहे. दोन आठवडे चालणार्‍या या सरावात 30 युद्धनौका, 40 लढाऊ विमाने व पाच हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. गेल्या दोन दशकांपासून ‘सी ब्रीझ’ सरावाचे आयोजन होत असून, यावेळी होणारा सराव सर्वात मोठा व व्यापक असल्याचे नाटोकडून सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनसह इतर मुद्यांवरून रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ही बाब महत्त्वाची ठरते. गेल्याच महिन्यात ब्लॅक सी सागरी क्षेत्रात ब्रिटनच्या युद्धनौकेने राबविलेल्या मोहिमेनंतर रशियाने नाटो व युक्रेनचा सराव अतिशय गांभीर्याने घेतला आहे. रशियन नेते व अधिकार्‍यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा सराव चिथावणीखोर घटना असल्याचा आरोप केला आहे. पाश्‍चात्यांच्या या चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानेही आक्रमक पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने क्रिमिआमध्ये ‘एस-400’सह इतर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करून ‘एरिअल डिनायल टेस्टस्’ प्रकारातील चाचण्या केल्या होत्या.

बॉम्बिंग एक्सरसाईजत्यापाठोपाठ नाटो-युक्रेन सरावाच्या नजिकच्या क्षेत्रात लढाऊ विमानांच्या सहाय्याने ‘बॉम्बिंग एक्सरसाईज’ करणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. रशियाच्या या सरावात ‘ब्लॅक सी फ्लीट’चा भाग असलेली ‘एसयु-24एम बॉम्बर्स’, ‘एसयु-34 फायटर बॉम्बर्स’, ‘एसयु-30एसएम मल्टिपर्पज फायटर्स’ व ‘एसयु-27’ ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. या विमानांनी शत्रूच्या युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ले व बॉम्बिंगचा सराव केला, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे.

या सरावापूर्वी काही दिवस आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, क्रिमिआच्या सागरी हद्दीजवळून जाणारी ब्रिटीश युद्धनौका रशियाने बुडविली असती तरी त्यावरून तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता नव्हती, असा टोला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लगावला होता. त्यानंतर आता रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनीही ब्लॅक सीमध्ये सराव करणार्‍या युद्धनौकांना इशारा दिला आहे. यापुढे जर कोणी ब्लॅक सी सागरी क्षेत्रात चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या नाकावर सणसणीत ठोसा बसेल, असे रिब्कोव्ह यांनी बजावले.

यावेळी त्यांनी गेल्या महिन्यात ब्रिटीश युद्धनौकेने क्रिमिआनजिकच्या सागरी क्षेत्रातून केलेला प्रवास हा अमेरिका व ब्रिटनकडून युक्रेनला चिथावणीसाठी दिलेले प्रोत्साहन होते, असा आरोपही केला. ब्र्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ क्रिमिआनजिकच्या सागरी हद्दीतून प्रवास करीत असताना रशियन गस्तीनौकांनी ब्रिटीश युद्धनौकेचा पाठलाग करून ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडले होते. रशियाच्या लढाऊ विमानांनी ब्रिटीश युद्धनौकेला रोखण्यासाठी समुद्रात बॉम्ब टाकले, असा दावाही रशियन संरक्षणदलाने केला होता. मात्र ब्रिटनने यासंदर्भातील रशियाचे दावे फेटाळून लावले होते.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info