मॉस्को/किव्ह – रशियाने २४ तासांच्या अवधीत युक्रेनमधील ३००हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. यात पश्चिम युक्रेनमधील लिव्ह शहर, पूर्व युक्रेनमधील खार्किव्ह यांच्यासह १० शहरांचा समावेश आहे. रशियाचे हल्ले वाढत असतानाच मारिपोलमधील फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या युक्रेनी लष्कराच्या तुकडीने शरणागती पत्करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. या नकारानंतर रशियाने मारिपोलची कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पाश्चिमात्य माध्यमांनी दिले आहे.
गेल्या आठवड्यात रशियन नौदलाची ‘मोस्कव्हा’ ही युद्धनौका बुडाली होती. हे नुकसान युक्रेन युद्धातील रशियाचे सर्वात मोठे नुकसान ठरले आहे. मोस्कव्हाच्या दुर्घटनेनंतर रशियाने अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. गेल्या चार दिवसात सातत्याने युक्रेनवरील हल्ल्यांची व्याप्ती व तीव्रता वाढविण्यात येत आहे. राजधानी किव्ह, युक्रेनमधील दुसर्या क्रमांकाचे शहर असणारे खार्किव्ह, पश्चिम युक्रेनमधील लिव्ह यासह पूर्व व दक्षिण युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र, रॉकेट्स तसेच तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत आहे. रविवारी लिव्हमध्ये एकापाठोपाठ एक पाच क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सात जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांसाठी रशियाने दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे समोर आले. पूर्व युक्रेनमधील खार्किव्ह व इझियम शहरावर जोरदार हल्ले चढविण्यात आल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. तर लुहान्स्क प्रांतातील क्रेमिना शहर रशियन फौजांनी ताब्यात घेतल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकार्यांनी सांगितले. मात्र असे असले तरी पूर्व युक्रेनवरील ताबा आपण सहजासहजी सोडणार नसल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिला. युक्रेनमधील संघर्ष पुढील १० वर्षांसाठी चालू राहिल, असा दावाही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
गेल्या २४ तासांमध्ये रशियन संरक्षणदलांनी चढविलेल्या हल्ल्यात युक्रेनची तीन लढाऊ विमाने व ११ ड्रोन्स पाडल्याची माहिती संरक्षण विभागाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी दिली. त्याचबरोबर युक्रेनी लष्कराच्या १८ कमांड पोस्टस्, २२ आर्टिलरी बॅटरीज् व ‘सरफेस टू एअर मिसाईल सिस्टिम’ नष्ट केल्याचेही रशियन प्रवक्त्यांनी सांगितले. युक्रेनी लष्कराच्या एकूण ३१५ ‘टार्गेटस्’ना लक्ष्य केल्याचा दावा इगोर कोनाशेन्कोव यांनी केला.
दरम्यान, मारिपोलमधील ‘ऍझोव्हस्टॅल’ फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या युक्रेनी लष्करी तुकडीने शरणागतीचा प्रस्ताव नाकारला आहे. या नकारानंतर रशियाने मारिपोलची कोंडी करून सदर तुकडीवर हल्ला करण्याची योजना आखल्याचे वृत्त पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी दिले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |