युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता वाढवित असतानाच रशियाकडून युक्रेनला संघर्षबंदीचा नवा प्रस्ताव

मॉस्को/किव्ह – युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवित असतानाच, रशियाने पुन्हा एकदा युक्रेनला युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे. रशियाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याची माहिती दिली. मात्र हा प्रस्ताव दिला तरी, युक्रेनचे सरकार रशियाबरोबरील वाटाघाटीबाबत गंभीर नसल्याचा ठपका पेस्कोव्ह यांनी ठेवला आहे. तर रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा यांनी युक्रेनच्या सरकारवर दुसर्‍या देशाचे नियंत्रण असल्याचा आरोप करून यामुळे हे सरकार आपल्या मागण्या बदलत राहते, असा टोला लगावला आहे.

युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता

डोंबास क्षेत्राजवळ रशियाने आपल्या लष्करी हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्याचवेळी पूर्व युक्रेनमधील शहरांवरील रशियाचे हल्ले तीव्र झाले आहेत. मारिओपोल शहरातील युक्रेनी लष्कराला शरण येण्याची आणखी एक सूचना रशियाने दिली आहे. यासाठी दिलेला वेळ निघून जात असल्याचे सांगून रशियन अधिकार्‍यांनी इथल्या युक्रेनच्या लष्कराला निर्णायक इशारा दिला. इथला युक्रेनी लष्कराचा अधिकारी आपल्यासमोर शरण जाण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याचे सांगत असेलला व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

मारिओपोलमध्ये युक्रेनी लष्कर हतबल बनलेले असताना, युक्रेनकडून या युद्धात रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत रशियाच्या क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी युक्रेनला ठोस शब्दात पाठविलेल्या प्रस्तावाची माहिती माध्यमांना दिली. याबाबत बोलताना दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनच्या सरकारवर आपला अजिबात विश्‍वास नसल्याचे ठासून सांगितले. तर रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाकारोव्हा यांनी ‘विश्‍वास ठेवा, पण छाननी करा’ या पारंपरिक वचनाची आठवण करून दिली. मात्र युक्रेनबाबत विश्‍वास ठेवण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे सांगून छाननी केल्याखेरीज युक्रेनशी व्यवहार करणे शक्य नसल्याचे झाकारोव्हा यांनी स्पष्ट केले.

युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता

युक्रेनचे सरकर दुसर्‍या देशाकडून नियंत्रित केले जाते. यामुळे आत्तापर्यंत अनेकवार युक्रेनच्या सरकारने चर्चेतील आपल्या मागण्या बदलल्या असून त्यामुळे या सरकारवर विश्‍वास ठेवणे शक्यच नसल्याचा दावा झाकारोव्हा यांनी केला आहे. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी रशियन सैन्य युक्रेनच्या जनतेला लक्ष्य करीत असल्याचे पाश्‍चिमात्यांचे आरोप धुडकावून लावले आहेत. तर अमेरिकेतील रशियाच्या दूतावासाने रशियाची कोंडी करण्याची व निर्बंध लादण्याचे अमेरिकेचे धोरण दारूण अपयशी ठरल्याचा टोला लगावला आहे. हे अपयशी धोरण अमेरिकेने बदलावे, असे रशियन दूतावासाने म्हटले आहे. त्याचवेळी युक्रेनच्या सरकारला हाताशी धरून हे युद्ध लांबविण्याची तयारी अमेरिका करीत असल्याचे आरोप अधिकच तीव्र बनत चालले आहेत.

या युद्धात आत्तापर्यंत ५० लाखाहून अधिकजणांनी युक्रेन सोडून इतर देशांमध्ये धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढच्या काळात या युद्धाची तीव्रता वाढणार असल्याचे संके देऊन रशियाने या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर रशियाने युक्रेनला प्रस्ताव देऊन आपण अजूनही हे युद्ध रोखण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले. त्याचवेळी युक्रेनचे सरकार मात्र हे युद्ध थांबविण्याबाबत गंभीर नसल्याची बाब रशिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत असल्याचे दिसत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info