मॉस्को/किव्ह – रशियाच्या विरोधात युक्रेन व इतर देशांना पुरविण्यात येणारी शस्त्रास्त्रे हा युरोप खंडाच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरेल, असा इशारा रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. तर युक्रेनने पाश्चिमात्यांनी दिलेल्या शस्त्रांच्या बळावर रशियावर हल्ले चढविल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील व यासंदर्भात दिलेला इशारा संबंधित देशांनी गांभीर्याने घ्यावा, असे परराष्ट्र विभागाने बजावले आहे. रशिया इशारे देत असतानाच, ब्रिटन तसेच नाटोने रशियाविरोधातील युद्ध जितके लांबेल तितका काळ आपण युक्रेनचा शस्त्रपुरवठा कायम ठेऊ, असे जाहीर केले.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने युद्धाचा दुसरा टप्पा सुरू केल्याची घोषणाही केली आहे. या टप्प्यात रशियाने पूर्व तसेच दक्षिण युक्रेन भागाला लक्ष्य केले असून गेले काही दिवस या क्षेत्रात सातत्याने व तीव्र हल्ले सुरू आहेत. डोन्बास क्षेत्रासह दक्षिण युक्रेनमधील काही शहरांवर ताबा मिळविण्यात रशियाला यश मिळाले आहे. रशियाची ही आगेकूच सुरू असतानाच पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला होणारा शस्त्रपुरवठा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेसह ब्रिटन, पोलंड, जर्मनी, नेदरलॅण्डस्, फ्रान्स हे देश यात आघाडीवर आहेत.
रशियाने युक्रेनमधील कारवाई सुरू केल्यानंतर एकट्या अमेरिकेने युक्रेनला दोन अब्ज डॉलर्सहून अधिक शस्त्रसहाय्य पुरविले आहे. ब्रिटन व पोलंडनेही एक अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे पुरविली आहेत. जर्मनीनेही एक अब्ज डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. यात क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, रॉकेट्स, तोफा, रणगाडे, सशस्त्र वाहने, हेलिकॉप्टर्स यांचा समावेश आहे. या शस्त्रांच्या बळावर युक्रेनने रशियन फौजांना प्रतिकार करण्याबरोबरच रशियन हद्दीत हल्ले चढविण्यासही सुरुवात केली आहे.
रशियात होणाऱ्या हल्ल्यांवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बुधवारी युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या देशांना नवा इशारा दिला होता. त्यात पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमध्ये मर्यादेबाहेर हस्तक्षेप केल्यास त्याला वीजेच्या वेगाने प्रत्युत्तर मिळेल, असे बजावले होते. पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी त्याला दुजोरा देतानाच पाश्चिमात्य देशांकडून पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्यावर टीकास्त्र सोडले. युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य युरोप खंडाची सुरक्षा व स्थैर्यासाठी धोकादायक आहे, असे पेस्कोव्ह यांनी बजावले. रशियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनीही पाश्चिमात्य देशांना खरमरीत इशारा दिला.
‘पाश्चिमात्य देश युक्रेनला शस्त्रपुरवठा करून त्या शस्त्रांच्या बळावर रशियावर हल्ले चढविण्याची चिथावणी देत आहेत. अशा चिथावण्यांविरोधात रशियाच्या संरक्षण विभागाने योग्य इशारा दिला आहे. पाश्चिमात्य देशांनी आमच्या सहनशक्तीची अधिक परीक्षा घेऊ नये’, असे झाखारोव्हा यांनी बजावले.
दरम्यान, ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी युक्रेनमधील युद्ध 10 वर्षेदेखील चालू राहू शकते व पाश्चिमात्य देशांनी त्यासाठी तयारी ठेवायला हवी, असे वक्तव्य केले आहेत. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही, नाटोच्या सदस्य देशांनी दीर्घकाळपर्यंत युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला दिला. त्याचवेळी नाटो स्वीडन व फिनलंडला तातडीने सदस्य म्हणून सामील करून घेण्यास तयार असल्याचा दावा स्टॉल्टनबर्ग यांनी केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |