मॉस्को/किव्ह – रशियाकडून युक्रेनमधील अनेक आघाड्यांवर तीव्र हल्ले सुरू असल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षणदलाने केला आहे. पूर्व युक्रेनमधील खार्किव्हसह अनेक शहरांमध्ये रशियन फौजांनी आघाडी उघडली असून दक्षिण युक्रेनमधील ओडेसा व नजिकच्या भागातही मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच अमेरिका व इतर नाटो सदस्य देशांनी ‘नॉथॅ मॅसिडोनिया’मध्ये व्यापक सराव सुरू केला आहे. या सरावात 19 देशांचे साडेचार हजार जवान सहभागी झाले आहेत. हा सराव रशियाला संदेश असल्याचा दावा नाटोशी संबंधित सूत्रांनी केला आहे.
.दुसऱ्या महायुद्धातील रशियन विजयाचे प्रतीक असणाऱ्या ‘व्हिक्टरी डे’च्या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, 1945 सालाप्रमाणेच यावेळी विजय आपलाच असेल, अशी ग्वाही दिली होती. पुतिन यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रशियन संरक्षणदलांनी आपले हल्ले अधिक प्रखर केले आहेत. पूर्व युक्रेनचा भाग असणाऱ्या डोन्बासमधील पाच शहरांवर एकाच वेळी हल्ले सुरू झाले आहेत. यात लिमन, बाखमत, ॲव्हडिव्का, कुराखिव्ह व सिविरोडोनेत्स्क या शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला खार्किव्हवर संपूर्ण ताबा मिळविण्यासाठीही रशियन फौजांनी जोर लावला असल्याची माहिती समोर येत आहे. डोन्बासमधील पोपास्ना व रुबिझ्ने ही शहरे रशियाने ताब्यात घेतली आहेत.
पूर्व युक्रेनपाठोपाठ दक्षिण युक्रेनवर ताबा मिळवून युक्रेनचा सागरी क्षेत्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडण्यासाठी ओडेसा व जवळच्या क्षेत्रात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा सुरू आहे. यात ‘हाय प्रिसिजन मिसाईल्स’ तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र ओडेसावर ताबा मिळविण्यासाठी रशियाला आपल्या युक्रेनमधील लष्करी आघाडीची फेररचना करावी लागेल, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, फिनलंड व स्वीडनच्या संभाव्य सदस्यत्वाच्या पार्श्वभूमीवर नाटोने रशियाविरोधात अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. पुढील काही दिवसात युरोपिय देशांमध्ये लष्करी तसेच युद्धसरावांचे आयोजन करण्यात आले असून त्यातून रशियाला संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे नाटो सूत्रांचे म्हणणे आहे. यापैकी ‘स्विफ्ट रिस्पॉन्स 22′ या सरावाला नॉर्थ मॅसिडोनियात सुरुवात झाली आहे. या सरावानंतर इस्टोनिया-लाटविया सीमेवर ‘हेजहॉग’ नावाचा युद्धसराव आयोजित करण्यात आला आहे. यात नाटो सदस्य देशांचे 18 हजार जवान सहभागी होणार आहेत.
दरम्यान, युरोपिय महासंघाने युक्रेनला 52 कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |